मेट्रो रेल्वेच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीला फटका बसणार आहे. नागरिकांची अधिक गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. हिंगणा मार्गावरील मेट्रो रेल्वेचे काम सुरू करण्यासाठी या मार्गावरील सर्व अतिक्रमण दूर करण्यात येणार असल्याचे 'एनएमआरसीएल'कडून कळविण्यात आले.
मेट्रोच्या कामाच्या वेळी वाहतूक विस्कळित होऊ नये यासाठी एनएमआरसीएलचे अधिकारी आणि वाहतूक पोलिस विभागातील अधिकाऱ्यांनी पोलिस उपायुक्त ट्राफिक यांच्या कार्यालयात २९ जून रोजी चर्चा केली. वाहतुकीचे नियोजन कसे करायचे याचे नियोजन यावेळी करण्यात आले. झोपडपट्टी, पानठेले, दुकाने यांनी मोठ्या प्रमाणात हिंगणा रस्ता गिळंकृत केला आहे. या नागरिकांच्या उदरनिर्वाहाचे साधन असल्याने आतापर्यंत प्रशासनानेही या विरोधात धडक कारवाई केली नाही. त्यामुळे गेल्या कित्तेक वर्षांपासून हिंगणा मार्गावर हे अतिक्रमण कायम होते. रस्ता अरुंद असल्याने हिंगणा मार्गावर काम सुरू करण्यापूर्वी हा रस्ता अतिक्रमणापासून मुक्त करणे आवश्यक आहे.
मेट्रोचे कर्मचारी करणार ट्राफिक नियंत्रण वाहतूक नियंत्रणात अडचणी येऊ नये यासाठी मेट्रो रेल्वेकडूनही अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. एनएमआरसीएलचे कर्मचारीही वाहतूक नियंत्रणात सहाय्य करणार आहेत. 'एनएमआरसीएल'चे जनसंपर्क अधिकारी शिरीष आपटे यांनी यावेळी प्रकल्पाचे सादरीकरण केले. मेट्रोचे सल्लागार जयंत उके यांनी 'ट्राफिक सर्व्हे व ट्राफिक डायव्हर्षन प्लान' मांडला. मेट्रोचे सुरक्षा सल्लागार अरविंद गिरी यावेळी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट