यंदाच्या शैक्षणित वर्षांत वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र व औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थी महाविद्यालयांकडे २० जुलैपर्यंत अर्ज सादर करू शकतात.
२०१६-१७ या शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. महाविद्यालयांकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ३१ जुलैपर्यंत अर्ज पाठवायचे आहे. समितीने येत्या ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज तपासून द्यायचे आहेत. विद्यार्थ्यांनी २० जुलै पूर्वी आपला अर्ज http:barti.maharashtra.gov.in या वेबसाईटवर भरून ऑनलाइन अर्जाची प्रिंट काढावी. त्यासोबत आवश्यक कागदपत्रे संलग्न करून अर्ज संबंधित महाविद्यालयाकडे अथवा प्रत्यक्ष समितीकडे सर्व मूळ कागदपत्रासह सादर करावा. तसेच शैक्षणिक संस्थेकडे जसजसे अर्ज प्राप्त होतील तसतसे ते संबंधित समितीकडे पाठवावेत.
ही कागदपत्रे आवश्यक जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावासोबत अर्जदाराचा जातीचा दाखला, वडिलांचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, जातीची नोंद असलेली कोतवाल बुकाची नक्कल या कागदपत्रांची मूळ प्रत सादर करावीत. ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तूशास्त्र व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांचेच अर्ज स्वीकारण्यात येईल. संपर्क- (०७१२-२५६६८३६)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट