पावसाच्या कोसळणाऱ्या सरळसोट धारा आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या केसांचे वळण यात काही साम्य आहे का? नाही म्हणू नका. कारण या दोघांना जोडणारा एक समान धागा आहे. पडलात ना बुचकळ्यात? हा धागा आहे, व्यंगचित्रांच्या रेषा. होय, व्यंगचित्रांच्या माध्यमातून या दोन टोकांवरील दोन विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न नागपुरात होऊ घातला आहे.
दर्जेदार व्यंगचित्रांची बोलकी रेषा चेहऱ्यावरही स्मितहास्याची रेषा रेखाटून जाते. कधी एक शब्दही न बोलता मनाचा ठाव घेते तर कधी वर्मी असा काही घाव घालते की दीर्घकाळ स्मरणात राहावी. भाषा आणि भूप्रदेशाच्या सीमा ओलांडूनही अंगुळभर उरते ती व्यंगचित्रांची रेषा. अशा रेषांची जादूई करामत बघण्याची आणि ती रेखाटणाऱ्या प्रतिभावंतांना भेटण्याची संधी नागपूरकरांना उपलब्ध झाली आहे. विदर्भातील दर्जेदार व्यंगचित्रकारांसह राज्यातील नामवंतांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन नागपुरात येत्या २३ व २४ जुलै रोजी होणार आहे. विदर्भातील तब्बल २० व्यंगचित्रकार या निमित्ताने स्वतःची व्यंगचित्रे आणि अर्कचित्रे नागपुरातील रसिकांसमोर सादर करणार आहेत. कार्टुनिस्ट झोन आणि चिटणवीस सेंटर यांच्यावतीने हे प्रदर्शन आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, शनिवारी सकाळी ११ वाजता त्याचे उद्घाटन होणार आहे. ख्यातनाम व्यंगचित्रकार चारुहास पंडित, वैजनाथ दुलंगे आणि घनश्याम देशमुख यांना या कार्यक्रमासाठी विशेषत्वाने आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या जोडीने विदर्भातील विनय चानेकर, गजानन घोंगडे, उमेश चारोळे, राजीव गायकवाड, गणेश बोबडे, विष्णू आकुलवार, रवींद्र बाळापुरे, सतीश उपाध्याय, पीयूष जोशी, अशोक बुलबुले, गजानन वानखडे, प्रभाकर दिघेवार, गणेश वानखडे, शशीकांत सप्रे, सुधीर राऊत, सुधीर ठोकळ आणि गजेंद्र चंद्रशेखर हे वैदर्भीय व्यंगचित्रकारही या अनोख्या कार्यक्रमात एकत्र येणार आहेत.
या सर्व चित्रकारांची सुमारे २०० चित्रे या प्रदर्शनात मांडली जाणार आहेत. त्यांना चित्र काढताना बघण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी व्यंगचित्रप्रेमींना उपलब्ध होणार आहे.
मान्यवरांचे विशेष मार्गदर्शन
चारुहास पंडित, वैजनाथ दुलंगे आणि घनश्याम देशमुख हे तीनही गाजलेले व्यंगचित्रकार व्यंगचित्रांबद्दल या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील. चारुहास पंडित हे 'व्यंगचित्रमालिका', घनश्याम देशमुख हे 'सोशल मीडिया आणि व्यंगचित्रकलेचे जागतिक व्यासपीठ' तर वैजनाथ दुलंगे हे राजकीय व्यंगचित्रांबद्दल बोलतील. आपल्या कामांची प्रात्यक्षिकेदेखील ते यावेळी सादर करतील.
काढून घ्या स्वतःचे अर्कचित्र!
रसिकांसाठी या प्रदर्शनात केवळ बघ्याची भूमिका राहणार नसून, व्यंगचित्रांच्या दुनियेचा वेगळा अनुभवही त्यांना घेता येणार आहे. मान्यवरांशी संवाद साधण्याची, त्यांना प्रत्यक्ष चित्र काढताना बघण्याची आणि व्यंगचित्र तयार होण्याची प्रक्रिया बघण्याची संधी रसिकांना मिळेल. याच्या जोडीने उपस्थित व्यंगचित्रकांरांकडून स्वतःचे अर्कचित्रदेखील काढून घेण्याची आगळी संधीही मिळणार आहे.
व्यवसाय करता यावा
कलाम यांचे निधन झाले तेव्हा अशा प्रकारचे प्रदर्शन मुंबई, पुण्यात झाले होते व त्याला भरपूर प्रतिसाद देखील मिळाला होता. त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असताना असाच प्रयोग आता नागपुरातही होतो आहे. मराठी व्यंगचित्रे ही जागतिक स्तरावर पोहोचली पाहिजेत आणि त्यातून व्यवसायही करता आला पाहिजे. मराठी व्यंगचित्रांचे अॅपही तयार करण्यात आले आहे. अशा सगळ्या विषयांवर या प्रदर्शन आणि कार्यशाळेत चर्चा होईल, असे घनश्याम देशमुख म्हणाले.
संवाद साधण्याचा प्रयत्न
'चिंटू' चा आधार घेत व्यंगचित्रमालिका या विषयावर व्यंगचित्रकारांशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. चित्रमालिकेतील कल्पना कशा सुचतात, त्यांची मांडणी, चित्रांचा कोन कसा असावा, तिसऱ्या चित्रात अपेक्षित पंच कसा आला पाहिजे, चित्रांचे संपादन यावरदेखील कार्यशाळेदरम्यान आदानप्रदान होणार आहे, असे चारुहास पंडित यांनी सांगितले.
कलाकारांना प्रेरणा
गायक आणि अभिनेत्यांना कला सादर करताना अनेकवेळा बघितले असते. मात्र, या प्रदर्शनाच्या निमित्ताने व्यंगचित्रकार कसे काम करतात, चित्रे कशी रेखाटली जातात हे बघता येणार आहे. व्यंगचित्रकलेची आवड नवीन निर्माण होण्यासाठी आणि समाजाची सांस्कृतिक अभिरुची घडविण्यासाठी अशी प्रदर्शने आवश्यक ठरतात. व्यंगचित्रे काढत राहिली पाहिजे अशी कलाकारांना प्रेरणा देणारे हे प्रदर्शन असेल, असे गजानन घोंगडे म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट