केवळ ग्रामपंचायतीची तात्पुरती परवानगी घेऊन उंचउंच इमारती उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर शनिवारी नागपूर सुधार प्रन्यासच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारला. संपूर्ण इमारत पाडण्यासाठीच पथक या भागात पोहोचले. घोगली येथे चार मजली इमारतीचा काही भाग पाडण्यातही आला. मात्र, बेसा येथील कारवाई बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधामुळे थांबविण्यात आली.
घोगली परिसरात गोल्ड स्टोन इन्फास्ट्रक्चर प्रा.लि. हा बालकृष्ण गांधी यांचा गृहबांधणी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी केवळ ग्रामपंचायतीची परवानगी घेण्यात आली. मेट्रो रिजन परिसरात येऊनही नासुप्रची परवानगी न घेता चार मजली इमारत उभी करण्यात आली. इमारतीचे काम अद्याप सुरूच असून सात मजली इमारत उभी करण्याचे नियोजन आहे. ही इमारत बेकायदेशीररित्या उभारली जात असल्याच्या तक्रारी नासुप्रकडे प्राप्त झाल्या होत्या. या आधारावर नासुप्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली. अखेर ही इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.
कार्यकारी अभियंता राजीव पिंपळे, अशोक गौर, विभागीय अधिकारी अविनाश बडगे, पथक प्रमुख वसंत कन्हेरे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नासुप्रचे पथक या भागात पोहोचले. कारवाई करू नये, यासाठी बांधकाम व्यावसायिकाने विरोध केला. पथकाकडून तीन दुकानांचे शटर तोडण्यात आले. पॅराफीट वॉल तसेच तिसऱ्या माळावरील भिंतीही तोडण्यात आल्या. चौथ्या माळ्यावरील स्लॅबही तोडण्यात आल्याचे नासुप्रकडून सांगण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट