कृषी हंगामात कुणी शेतकऱ्यांना फसविण्याचा प्रयत्न करीत असल्यास शेतकऱ्यांनी थेट तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कृषी विभागाने जिल्हा आणि तालुकास्तरावर एकूण १४ तक्रार निवारण कक्ष सुरू केले आहेत.
गुणवत्ता नियंत्रण कक्षाकडे नोंदविलेल्या एमआरपीपेक्षा ज्यादा दराने निविष्ठा विक्री, मुदतबाह्य निविष्ठांची विक्री, कमी वजनाच्या निविष्ठांची विक्री, निविष्ठांची अवैध साठेबाजी किंवा काळाबाजारी, बोगस अथवा अनधिकृत निविष्ठांची विक्री, लिंकिंग संबंधातील तक्रारी, विनाबिल किंवा विना पावतीने निविष्ठांची विक्री, अनधिकृत एजंट, प्रतिनिधीमार्फत साखळीपद्धतीने परस्पर शेतकऱ्यांना निविष्ठांची विक्री करणे, याबाबतच्या तक्रारी शेकऱ्यांना कक्षात करता येतील.
जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्षात कृषी विकास अधिकारी (जि.प.), तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्षात तालुका कृषी अधिकारी काम पाहणार आहेत. कामठी, हिंगणा, सावनेर, काटोल, कळमेश्वर, नरखेड, रामटेक, पारशिवनी, मौदा, उमरेड, भिवापूर, कुही या तालुक्याच्या ठिकाणी तक्रार निवारण केंद्रांची यंत्रणा उभारण्यात आली आहे.
पेरणीनंतर बियाण्यांमध्ये भेसळ आढळणे, बियाण्याची कमी उगवण असणे, कीडरोगांचा प्रादुर्भाव, बियाण्याची अनुवांशिक शुद्धता इत्यादी संबंधात शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्याची झाल्यास त्यांनी उपविभाग स्तरावरील तक्रार निवारण समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट