म. टा. प्रतिनिधी,नागपूर
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सायंकाळी अचानक संघ मुख्यालयात गाठले. सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्यासोबत या दोघांनीही बंदद्वार चर्चा केली. सरसंघचालक मोहन भागवत शहराबाहेर आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा दीड आठवड्यांत विस्तार होण्याची शक्यता असल्याने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सुमारे सव्वादोन दोन्ही नेते मुख्यालयात होते.
दानवे दुपारनंतर नागपुरात आले. वैयक्तिक कामानिमित्त ते नागपुरात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सदर काम आटोपून दानवे सायंकाळी महालातील संघ मुख्यालयात आले. त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही विमानतळावरून थेट मुख्यालयाकडे रवाना झाले. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या १७ किंवा २४ मे रोजी होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी यानुषंगाने दिल्लीत फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही चर्चा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे.
फडणवीस यांना सत्तासूत्रे हाती घेऊन तसेच मंत्रिमंडळ विस्तार होऊनही सव्वा वर्षाहून अधिकचा काळ झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून विस्ताराची चर्चा आहे. मात्र घटकपक्ष आणि शिवसेना यांच्यात जागावाटपाचा ताळमेळ बसविणे भाजपसाठी अवघड होऊन बसले आहे. दोन घटक पक्षांनी तर पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराला वेग आला आहे. जुलैमध्ये विधान परिषदेचे काही सदस्य निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी मित्र पक्षाला सामावून घेत मंत्रिमंडळ विस्तार आणि स्वपक्षीय भाजपमधील कार्यकर्त्यांना पद मिळत नसल्याने वाढत असलेली नाराजी सांभाळण्याचे दुहेरी आव्हान भाजपपुढे आहे. यासोबतच गोवंश हत्याबंदीबाबत राज्य सरकारने जाहीर केलेली भूमिका, बीफ बाळगण्याची परवानगी याही मुद्यांवर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट