म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
विदर्भातील काँग्रेस नेत्यांची दिलजमाई करण्यासाठी पुढाकार घेणारे माणिकराव ठाकरे यांच्या गळ्यात विधान परिषदेच्या उपसभापतिपदाची माळ पडल्याने ऐक्याचे समीकरण बदलणार आहे. पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात सहभागी होता येणार असले तरी, ते सक्रिय दिसणार नाहीत. गुप्त बैठकांच्या माध्यमातून संघटनेवरील पकड कायम ठेवण्याचे प्रयत्न करण्याचे संकेत मिळाले आहेत.
काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी अलीकडेच नांदेडचा दौरा केला. त्यावेळी विदर्भातील नेत्यांची दिलजमाई करण्यासाठी विशेष प्लान करण्याची योजना ठाकरे व सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी गांधी यांना सांगितले. त्यांनी संमती देताच पहिली बैठक नागपुरात झाली. यास विदर्भातील प्रमुख नेते उपस्थित होते.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पक्ष हळूहळू स्थिरावला आहे. भूसंपादन विधेयकाविरोधात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केलेल्या आंदोलनाला उदंड प्रतिसाद लाभल्याने नेतेही सुखावले. दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे ठाकरे यांच्याकडून अशोक चव्हाण यांच्याकडे आली. परंतु, गटबाजी आणि नाराजीचे प्रमाण कमी झालेले नाही. महापालिका, जिल्हा परिषदा व नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर असल्याने पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची ऐक्य व्हावे, यासाठी माणिकराव ठाकरे यांनी पुढाकार घेतला. त्यास अशोक चव्हाण व मुकुल वासनिक यांनी बळ दिले. काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य विलास मुत्तेमवार, माजी मंत्रीद्वय सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, माजी खासदार नरेश पुगलिया आदी नेते कामाला लागले. त्यांनी नागपुरात बैठक घेतली आणि दौरेही सुरू केले. या नेत्यांनी यवतमाळचा दौरा केल्यानंतर आज, रविवारी चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मुत्तेमवार, चतुर्वेदी व राऊत चंद्रपूरला जाणार असून माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, वामनराव कासावार, संजय देशमुख आदी देखील या बैठकीत सहभागी होणार आहे. पक्ष बळकट करणे व भाजपसह जातीयवादी शक्तिंविरोधात लढा उभारण्यासाठी हे दौरे असल्याचा या नेत्यांचा दावा आहे. त्यास आता माणिकराव ठाकरे यांचे छुपे बळ मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट