माध्यान्ह भोजन योजनेला २० जुलैपासून केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाशी कनेक्ट झाले आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून अनुदानाचा मोठा हिस्सा असून, त्यावर केंद्राची देखरेखदेखील राहणार आहे.
पोषण आहाराची माहिती ऑनलाइन स्वरुपात देणे सर्व खाजगी व सरकारी शाळांना भरणे अनिवार्य आहे. यासाठीचे अॅप अधिक चांगल्या स्वरुपात आता उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आहे. हे अॅप शाळांना संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यावे लागणार आहे. स्कूल पोर्टलसाठी प्रत्येक शाळेला वेगळा सांकेतांक मिळालेला आहे. हाच क्रमांक वापरून अॅपच्या साहाय्याने माहिती भरावी लागणार आहे. मुख्याध्यापक किंवा नेमलेल्या इतर व्यक्तींना दररोज ही माहिती अॅपच्या माध्यमातून भरावयाची आहे. यासाठी शाळेतील किमान पाच व्यक्तींचे मोबाइल क्रमांकांची नोंदणी तालुका स्तरावरून करून घ्यावयाची आहे. या पाच व्यक्तींमध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शालेय पोषण आहाराचे खाते सांभाळणारी व्यक्ती आणि उपशिक्षक यांचा समावेश आहे. प्रत्येक शाळेला १ जून रोजी आपल्याकडे शिल्लक असलेला साठादेखील नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी १६ ऑगस्ट ही अंतिम तारीख देण्यात आली आहे.
जुन्या अॅपमध्ये असलेल्या त्रुटी दूर करून नवीन अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. पोषण आहाराचे साहित्य संपण्यापूर्वी २० दिवस अगोदर पंचायत समिती कार्यालयात कळवून मालाची मागणीही नोंदवायची आहे.
प्रत्येक टप्प्यावर आढावा
शाळांनी पोषण आहारासंदर्भात दररोज भरलेली माहिती विविध पातळ्यांवर तपासली जाणार आहे. केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी, शिक्षण संचालक, केंद्र सरकारचा शिक्षण विभाग अशा विविध ठिकाणी ही माहिती तपासली जाईल व त्याचा रोज आढावा घेतला जाईल. ज्या शाळांची नोंदणी सरल प्रणाली केली असेल त्याच शाळांना या अॅपद्वारे माहिती भरता येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट