२४ सप्टेंबर २०१५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड घातली असता, दीपक बजाज यांचे साईकृपा प्रिन्सिपाल बंगलो नावाचे निवासस्थान, शाळा कार्यालय, सोसायटी कार्यालय आणि इतर परिसराच्या झडतीत १८ लाख १५ हजार ४९३ रुपये रोख आणि २ कोटी ६९ लाख १० हजार ३६५ रुपये किमतीचे घरगुती सामान, अशी एकूण २ कोटी ८७ लाख २५ हजार ८५८ रुपये किमतीची स्थावर व जंगम मालमत्ता आढळून आली होती. २६ सप्टेंबर २०१५ रोजी जरीपटका पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१)(ई), १३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. २९ सप्टेंबर रोजी पुन्हा सिंधू एज्युकेशन सोसायटीचे कार्यालय, सिंधू एज्युकेशन कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे कार्यालय तसेच कार्यालय परिसरातील प्रिंटिंग प्रेसचे पुरावे गोळा करण्याच्या हेतूने झडती घेतली असता, पतसंस्थेच्या गुप्त लॉकरमध्ये १३ लाख ८६ हजार ६१६ रुपयांची रोख रक्कम आढळून आली होती.
दीपक बजाज यांना १२ नोव्हेंबर २०१५ रोजी अटक करण्यात आली होती.२६ नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर झाली. तेव्हापासून ते कारागृहात आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास पूर्ण करून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१)(ई), १३(२), भादंविच्या विविध कलमांतर्गत दीपक बजाज आणि त्यांच्या पत्नी वीणा दीपक बजाज यांच्याविरुद्ध ८ फेब्रुवारी २०१६ रोजी आरोपपत्र दाखल केले आहेत. २६ जुलै रोजी आरोप निश्चित झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या ४ मार्चच्या निर्देशानुसार, बजाज यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. तो फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील गिरीश दुबे आणि आरोपीच्यावतीने अॅड. रजनीश व्यास काम पाहिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट