डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वनविकास योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे मानसिंगदेव अभयारण्यातील खुर्सापार या गावातील मासेमारी थांबली असल्याचा दावा पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने केला आहे. संपूर्ण व्याघ्र प्रकल्पातील ४० गावांमध्ये या योजनेचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचे वन विभागाने म्हटले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांचे व आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वनविकास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची सुरुवात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नोव्हेंबर २०१५ रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली येथे झाली होती.
या योजनेंतर्गत गावकऱ्यांना ई-लर्निंग, एल.पी.जी कनेक्शन, दुभत्या गायी, सौरऊर्जेवर चालणारे सोलर पम्प, स्वच्छता गृह, उघड्या विहिरींना संरक्षक भिंती व सोबतच गावकऱ्यांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न वनविभाग करीत आहे. गावातून पर्यटकांना हॉटेल्स, जंगल सफारीकरिता मार्गदर्शक, जंगल सफारी जिप्सीचालक मालक, पर्यटकांना राहण्याची सुविधा, विविध स्टॉल्स अशा अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून ग्रामविकास व नागरिकांचे जीवनमान उंचावण्यात वनविभाग मदत करीत आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या मानसिंगदेव अभयारण्यातील खुर्सापार गावातील नागरिकांना या योजनेंतर्गत ४८ कुटुंबाला एल.पी.जी कनेक्शन देण्यात आले आहे. याशिवाय, सोलर पथदिवे, १६ स्वच्छतागृहे, गावातील तरुणांना रोजगार, तलाव खोलीकरण, गुरांकरिता गोठे अशी विविध कामे प्रगतीपथावर आहेत. या योजनेमुळे गावातील अवैध वृक्ष तोड, बेकायदेशीर मासेमारी, वन्यप्राण्यांची शिकार करणे बंद झाले आहे. समितीद्वारे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी व उत्पन्नाची साधने उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पाचा प्रस्ताव संबधित विभागाकडे सादर केलेला असून लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.
वनविभागाद्वारे सदर योजनेची सुरवात पेंच व्याघ्रप्रकल्प, बोर व्याघ्रप्रकल्प, उमरेड कऱ्हांडला व्याघ्रप्रकल्प, टिपेश्वर अभयारण्यातील बफर क्षेत्रातील ४० गावांत झाली आहे. योजनेची अंमलबजावणी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), श्री. श्री. भगवान यांच्या मार्गदर्शनात होत असून, क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प, श्री. एम.एस. रेड्डी, विभागीय वनाधिकारी, श्री. अनिल निमजे, वनपरिक्षेत्र अधिकारी देवलापार (वन्यजीव), पी.एल. साठवणे आणि इतर कर्मचारी पेंच व इतर ठिकाणी योजना कार्यान्वित करीत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट