बल्लारपूर येथे दारू तस्करी करताना एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यास त्याच्या मुलासह अटक करण्यात आल्याची घटना शनिवारी समोर आली. दिगंबर भगत, (बडनेरा रोड, अमरावती) असे त्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.
अमरावती येथे पोलिस अधिकारी राहिलेले भगत यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूरसह काही ठिकाणी ठाणेदार म्हणूनही सेवा दिली आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाल्याची माहिती आहे. शनिवारी दुपारी बल्लारपूर येथील नगरपालिका चौकात पोलिसांनी त्यांच्या चारचाकी वाहनातून विदेशी दारूच्या आठ पेट्या जप्त केल्या. त्याची किंमत ७६ हजार रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिगंबर यांच्यासह त्यांचा मुलगा विकास (३१) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
........
दारूविक्रेत्यांकडून पोलिस पाटलाचा विनयभंग
यवतमाळ : गावात दारूविक्रीला विरोध केल्याने संतप्त झालेल्या दारूविक्रेत्यांनी गावातील महिला पोलिस पाटलाचा विनयभंग करीत धमकी दिली. पांढरकवडा तालुक्यातील करंजी येथे ही घटना घडली. पोलिस पाटील वंदना मनोज खैरे (४०) यांच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी संदीप ठमके, यशोदा बेसेकर, आनंद बेसेकर, मुनींद्र खैरे, गर्जना खैरे यांच्याविरोधात विविध कलमाखाली गुन्हे नोंदविले आहेत. गावातील अवैध दारूविक्रीला खैरे यांनी विरोध केला होता. त्यांनी आरोपींची दारूही पकडून दिली होती. त्यामुळे दारूविक्रेते संतप्त झाले होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट