'पाश्चात्त्य देशातील अभ्यासक्रम उचलून विद्यार्थ्यांच्या माथीवर मारले जात आहेत. तेथे अंगीकारले म्हणजे आपणही तेच करायचे काय, या पद्धतीत आता बदल करणे आवश्यक आहे,' अशी अपेक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले.
पदव्युत्तर शिक्षण विभागातर्फे अमरावती मार्गावरील मदर टेरेसा सभागृहात शनिवारी आयोजित 'चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम फॉर बी.एड. अॅण्ड एम.एड.' या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी संत गाडगेबाबा महाराज अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर व गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर, मरीन इंजिनीअरिंगचे प्र-कुलगुरू गौरीशंकर पाराशर उपस्थित होते. डॉ. काणे म्हणाले, 'दोन वर्षांपासून चॉइस बेस्डसाठी प्रयत्न सुरू असून केवळ विज्ञान शाखेनेच तत्परता दाखविली आहे. सेमिस्टरप्रमाणे चॉइस बेस्ड पाश्चात्त्य देशातील संकल्पना आहे. सेमिस्टरमध्ये सविस्तर अभ्यासक्रम शिकविला जात नाही. अभ्यासक्रमातील अनेक विषय सुटतात. आता मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयामुळे चॉइस बेस्ड सिस्टीम कोणत्याही परिस्थितीत राबवायची आहे. त्यामुळे प्राध्यापकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य करावे'.
प्रा. चांदेकर यांनी, 'चॉइस बेस्डमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे. मात्र, नव्या गोष्टींकडे नकारात्मक दृष्टिकोनातून बघू नये', अशी अपेक्षा व्यक्त केली. तर, प्रा. कल्याणकर यांनी, 'बदलत्या अभ्यासक्रमाकडे ओढा ठेवून गुणवत्ता आणि संधी वाढविण्यावर भर हवा. यामुळे विद्यार्थ्यांनी वर्षभर परीक्षाच द्यायच्या काय,' असे मत व्यक्त केले.
'चॉइस बेस्ड' काय?
या पद्धतीमुळे एका अभ्यासक्रमासोबतच दुसऱ्या अभ्यासक्रमातही प्रवेश घेता येईल. एखाद्या विद्यार्थी भौतिकशास्त्रात बी.एस्सी. करीत असल्यास त्याला त्यावेळी जीवशास्त्रातही प्रवेश घेऊन अभ्यास करता येईल. नागपूर विद्यापीठाने चॉइस बेस्ड पद्धत सुरू केली असली, तरी एकाही विद्यार्थ्यांने याला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे या सिस्टीमचा बट्ट्याबोळ होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
'बेस्ड'ला लागतील पाच वर्ष
एका विद्यापीठातून अन्य विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी ही पद्धत योग्य ठरू शकते. यासाठी प्रत्येकाने बदल स्वीकारणे गरजेचे आहे. देशातील कोणत्याही विद्यापीठातील ७५ टक्के विद्यार्थ्यांना रोजगार मिळत नाही. त्याऐवजी आयआयटी आणि आयआयएमसारख्या नामवंत संस्थेतून बाहेर पडल्यावर तीन नोकऱ्या हाताशी असतात. परिणामी, चॉइस बेस्ड अशावेळी उपयोगी ठरू शकते काय, याचाही विचार करावा लागेल. ही पद्धत रुजविण्यासाठी आणखी पाच वर्ष लागतील.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट