Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

समस्यांच्या महापुरात जनसंवादाचा दिलासा

$
0
0

महेश तिवारी, गडचिरोली

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भामरागडसह सुमारे दोनशे गावांचा नेहमी संपर्क तुटतो. लहान पुलांमुळे ही परिस्थिती दरवर्षी निर्माण होत असतानाही समस्या निकाली काढण्यात आलेली नाही. आरोग्य, रस्ते आणि रिक्तपदांचे प्रश्नही कायम आहेत. समस्यांच्या या महापुरात शहीद सप्ताहादरम्यान शांतता मेळाव्यातून जोडण्यात आलेला जनसंवादाचा धागा दिलासादायी ठरला.

गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य, रस्ते आणि विजेची समस्या कायम आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी होत असतानाही प्रश्न संपलेले नाहीत. पावसाळ्यात दुर्गम भागातील अनेक गावांचा वीजपुरवठा १५ दिवसांपर्यंत ठप्प पडतो. वनकायद्याच्या अडचणीमुळे नवीन खांब, तार लाइन टाकणे शक्य होत नाही. एटापल्ली, मूलचेरा, अहेरी, भामरागड, सिरोंचा तालुक्यांसाठी ही नेहमीची समस्या झाली आहे. यंदाही परिस्थितीत बदल झालेला नाही. पावसाळ्याच्या दिवसात थोडाही पाऊस झाला तरी भागरागड तालुक्याचा जगाशी संपर्क तुटतो. यंदा तीन वेळा हा अनुभव आला. दुर्गम भागातील रस्त्यांची दूरवस्था कायम आहे. आलापल्ली-सिरोंचा, आलापल्ली-भामरागड, आलापल्ली-एटापल्ली-जारावंडीपर्यंतचे रस्ते उखडले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असे चित्र या भागात आहे. पावसाळ्यात दुरुस्तीच्या नावावर खड्डयांमध्ये मुरुम टाकण्यात आले. लाखो रुपये खर्च झाले. पण, समस्या संपलेली नाही.

आरोग्याच्या बाबतीत जिल्ह्याच्या दुर्गम भागात मलेरिया, गॅस्ट्रो आणि मेंदूज्वराचे थैमान आहे. रिक्त पदे त्यातच डॉक्टर अनुपस्थित राहात असल्याने जीव जात आहेत. कोरची तालुक्यातील चार जणांचे बळी याच व्यवस्थेने घेतले. गेल्या वर्षीही डॉक्टरांच्या रिक्तपदांचा विषय चर्चेला आला होता. मात्र वर्षभरानंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही. राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर आहेत. व्यवस्थेची संपूर्ण जाण असल्याने परिस्थिती बदलण्याची आशा जिल्ह्यात व्यक्त होत होती. पण, गडचिरोलीच्या समस्या मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पोहचविणारा आवाजच उरला नसल्याने प्रश्न अधिक गहिरा झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू आहे. त्यानंतरही अवैध दारूविक्रेते दलालांच्या मदतीने आपले साम्राज्य तयार करण्याच्या तयारीत आहेत. देसाइगंज येथे पोलिसांच्या अंगावर वाहन नेण्यापर्यंतची दारू तस्करांची मजल गेली. देसाईगंजचे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी गेल्या काही दिवसांत भंडारा जिल्ह्यातून गडचिरोलीत होणारी दारू तस्करीवर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला. ५९ लाख रुपयांची दारू जप्त केली होती. यावरून संतापून हे पाऊल उचलण्यात आले. मुळात पोलिसांकडून सातत्याने दारूबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी मोहीम राबविली जाते. दारूही पकडली जाते. पण, आता यावर वचक निर्माण करण्याची गरज व्यक्त होत आहे.

शहीद सप्ताहादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया घडवून आणण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न असतो. पुराडा पोलिस स्टेशनवर गोळीबार करीत माओवाद्यांनी ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्यांचा तो हल्ला उधळून लावला. पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी त्यांच्या नावाप्रमाणे 'अभिनव' उपक्रम राबविला. शांतता मेळाव्याच्या माध्यमातून जनसंवादाचे एक नवे दालन उपलब्ध करून दिले. अतिसंवेदनशील भागातील नागरिकांना तालुका मुख्यालयी बोलावून शासकीय योजनांसदर्भातील माहिती देण्यात आली. सुमारे नऊ ठिकाणी असे शांतता मेळावे घेण्यात आले. विदर्भ कधीकाळी काँग्रेसचा गड मानला जात होता. पण, गेल्या निवडणुकांमध्ये हा गड ढासळला. कार्यकर्त्यांमध्येही मरगळ आली. ही मरगळ दूर सारून गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रमुख नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. यवतमाळ, चंद्रपूरनंतर या नेत्यांनी गडचिरोलीचा दौरा केला. कार्यकर्त्यांशी संवाद साधत नवा जोश निर्माण केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>