तो गरीब, अनाथ मुली दत्तक घ्यायचा. त्यांचा बाप बनायचा आणि त्यांच्यावरच अत्याचार करायचा. तो कुणी गुंड नाही, बदमाश म्हणून त्याची ओळख नाही. तो आहे एक वैज्ञानिक. ऐकायलाही नकोसा वाटावा, असा हा संतापजनक आणि घृणास्पद प्रकार धंतोली परिसरात घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 'नीरी'चा निवृत्त वैज्ञानिक डॉ. मकसूद हसन अन्सारी (७२) ला अटक केली आहे.
अन्सारी रसायनशास्त्रासह दोन विषयांत पीएच.डी. आहे. ३९ व्या वर्षी त्याचे लग्न झाले. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुली झाल्या. विकृतीमुळे त्याची पत्नी मुलीसह मकसूद याला सोडून गेली. त्यानंतर त्याने ५४ व्या वर्षी १९ वर्षीय तरुणीसोबत लग्न केले. लग्नानंतर तो तिचेही शोषण करू लागला. सुमारे १५ वर्षांपूर्वी त्याने मुलीला दत्तक घेतले. ती ७ वर्षांची झाल्यानंतर तो तिच्याशी अश्लील चाळे करून अत्याचार करू लागला. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देत होता. मुलीला कोंडून ठेवत होता. त्यानंतर त्याने दुसरी मुलगी दत्तक घेतली. ती ८ वर्षांची आहे. तिच्यावरही तो अत्याचार करू लागला. काही दिवसांपूर्वीच त्याने सहा वर्षांची तिसरी मुलगीही दत्तक घेतली. त्याचा संतापजनक प्रकार सुरूच होता. दोघींना तो केवळ शाळेत जाण्यासाठीच मुभा देत होता. तिघींवर तो सोबतच अत्याचार करीत होता, अशीही माहिती आहे.
चित्रकला स्पर्धेने उघडकीस आली घटना
काही दिवसांपूर्वी धंतोली भागात चित्रकला स्पर्धा झाली. पीडित १६ वर्षीय मुलगी स्पर्धेत सहभागी झाली होती. यावेळी तिला तिची मैत्रिण दिसली. मकसूदही तेथे होता. १६ वर्षीय मुलीला तिला काही तरी सांगायचे होते. मात्र, मकसूद तेथे असल्याने ती मैत्रिणीला काहीच सांगू शकत नव्हती. लघुशंकेच्या बहाण्याने दोघी शौचालयात गेल्या. पीडित मुलीने वडील अत्याचार करीत असल्याचे तिला सांगितले. मैत्रिणीला धक्का बसला. ती घरी आली. तिने तिच्या आईला हा प्रकार सांगितला. तिच्या आईने 'सेव्ह दी चिल्ड्रेन इंडिया'चे समन्वयक अनिरुद्ध पाटील यांना कळविले. त्यांनी पोलिस उपायुक्त दीपाली मासिरकर यांना घटनेची माहिती दिली. मासिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने सापळा रचून मंगळवारी मकसूदला अटक करून पीडित मुलींची सुटका केली.
दत्तक मुली घेतल्या कशा?
पुरुषाला मुलगी दत्तक देता येत नाही. मात्र, मकसूद याने तीन मुली दत्तक घेतल्या होत्या. त्याने मुली दत्तक कशा घेतल्या, हा मोठा प्रश्न आहे. यात शासकीय यंत्रणाही दोषी असून, याप्रकरणाचा सखोल तपास होण्याची मागणी होत आहे. १६ वर्षीय पीडित मुलीने काही वर्षांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मकसूदकडून होत असलेल्या प्रकाराबाबत तिने चाइल्ड लाइन संस्थेला सांगितले होते. मात्र, मकसूदयाने हे प्रकरण दाबले होते, अशीही माहिती आहे.
मुली दत्तक घेण्यासाठी पत्रके छापली
तीन वर्षांपूर्वी मकसूद याने मुली दत्तक घेण्यासाठी पत्रके छापली होती. अनेक ठिकाणी त्याने ती वितरित केली होती. त्यामुळे समाजात त्याला मान मिळत होता. सामाजिक कार्यातही तो सहभागी होत होता. तो नराधम असेल, अशी कल्पनाही कुणी केली नाही. मकसूद याच्या घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी तब्बल १५ पोती कपडे आढळून आले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट