vinod.waghamare@timesgroup.com
नागपूर : आम्ही पिढीजात शेतकरी. म्हणूनच पूर्वापार आमच्या घरी बैलजोडी राहिली आहे. वडील गेल्यानंतरही ती मोडली नाही. पण, तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. सोयाबीन, कापसाने दगा दिला. यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच अडचण जाणवली. रोजच्या जगण्यासाठीच पैसे नसताना बियाणे, खत कुठून घेणार? सावकाराकडे गेल्यास महिन्याला दहा टक्के व्याज द्यावे लागणार होते. म्हणून काळजावर दगड ठेवत बैलजोडी विकण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने घरातील साऱ्यांचे चेहरे पडले. दुसरा मार्गच उरला नव्हता. मात्र जीवापाड जपलेले आपले बैल नजरेसमोरच राहावेत म्हणून गावातीलच एकाला विकले. आज, गुरुवारी साजरा होणारा पोळा आमच्या घरी पहिल्यांदाच बैलजोडीशिवाय होणार आहे. पाणावलेल्या डोळ्यांनी रमेश लांजेवार कर्जापोटी बैलजोडी विकाव्या लागलेल्या तमाम शेतकऱ्यांचे दु:खच आपल्या माध्यमातून सांगत होते.
यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील पिंपरी इजारा हे शेतकरीबहुल गाव. रमेश हे ३५ वर्षीय शेतकरी त्यातीलच एक. साडेसहा एकर शेतीच्या भरवशावर तीन भावांचा संसार चालणे कठीण झाल्याने थोरल्या आणि धाकट्याने रोजमजुरीसाठी नागपूर गाठले. अजूनही ते तिथेच आपला उदरनिर्वाह करीत आहेत. रमेश यांनीही हाच निर्णय घेतला होता. पण, आपली वडिलोपार्जित शेती कोण करणार म्हणून त्यांनी गावातच राहणे पसंत केले. कोरडवाहू शेती असल्याने फारसे उत्पन्न होत नसले, तरी आई, पत्नी आणि दोन मुलांच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहाची सोय होत होती. मात्र, गेल्या तीन वर्षात परिस्थिती बिकट झाली. कधी अधिक पावसामुळे तर कधी पाऊसच नसल्याने हातचे पीक गेले. यातून उरलेले काही पीक रोही आणि डुकरांनी फस्त केले. लागवडीसाठी आलेला खर्चही निघणे कठीण होऊ लागले. त्यातच आईला हार्ट अटॅक आला. तिच्यावर यवतमाळ, नागपुरातील रुग्णालयांमध्ये उपचार केले. मोठा खर्च झाला. अजूनही औषधी सुरूच आहे. सततच्या या संकटांमुळे गाठीला चार पैसेही शिल्लक उरले नाही. खरीपाच्या सुरुवातीला पेरणीसाठी पैसेच उरले नाही. बँकेचे आधीचेच ८३ हजारांचे कर्ज होते. आणखी कर्ज कसे मिळणार? सावकाराचे दार ठोठावले. त्याने महिन्याला दहा टक्के व्याज लागणार म्हणून सांगितले. मुद्दलीपेक्षा व्याजच अधिक जाणार होते. दिवाळीपर्यंत घरच्याच पैशांवर खर्च भागवावा लागणार होता. त्यामुळे पडक्या चेहऱ्यानेच रमेश यांनी घर गाठले. बैलजोडी विकणे एवढाच एक पर्याय त्यांच्यासमोर उरला होता. घरच्यांसमोर हा विचार मांडताच पत्नी, मुले रडायला लागले. आजवर पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलेल्या आपल्या बैलांना विकायचा विचारही कसा आला, म्हणून ते संतापले. त्यांच्या भावनांची मला जाणीव होती. कुठेतरी आपला निर्णय चुकतोय हेदेखील ठाऊक होते. पण, सारेच मार्ग बंद झाले होते. अखेर आपली बैलजोडी गावातीलच कुणाला तरी विकण्याचा निर्णय घेतला. ३५ हजार रुपयांत सौदा पक्का झाला. बैलजोडी विकली असली तरी तिला आम्ही आजही रोज पाहू शकतो, याचे समाधानही आहे. पण, या पोळ्याला आपल्या घरासमोर बैलजोडी नसणार ही अस्वस्थता मात्र, मनात कालवाकालव करून जाते. सायंकाळी मातीचे बैल बनवून त्यांची पूजा करताना या बैलजोडीच्या घुंगरांचा आवाज आपल्या अंगणात घुमणार नाही, याच्या वेदना अधिक असल्याचेही रमेश सांगतात.
...
बाजारोबाजारी भाजीपाला विकतोय
शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून गुजराण करणे कठीण झाले आहे. बैलजोडीही राहिलेली नाही. हाताला कामच उरले नाही. म्हणून काही महिन्यांपूर्वी गावातच चिकन सेंटर उघडले. अनेकांनी टोकत दुसरा कुठला तरी व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. म्हणून आता गावाशेजारच्या आठवडी बाजारांत भाजीपाला विकतोय. चरितार्थ चालवितो, असेही रमेश लांजेवार यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट