वडिलांना कष्ट करताना शंकर बडे यांनी पहिले होते. लहानपणी ते शेतात वडिलांसोबत राबले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची होत असलेली परवड पाहून ते व्यथित होत. त्यांच्या 'मुगुट' या कवितेतून त्यांनी या व्यथांना वाचा फोडली होती. विनोदी वऱ्हाडी कवी अशी ओळख असतानाही वैदर्भीय शेतकऱ्यांच्या अकाली आत्मघाताने त्यांचे हृदय पिळवटून निघाले होते. गेल्या वर्षात त्यांनी विनोदी म्हणावी अशी एकही कविता लिहिली नव्हती.
शंकर बडे यांचा जन्म दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथे ३ मार्च १९४७ रोजी झाला होता. शालेय शिक्षण गावातच पूर्ण झाल्यावर महाविद्यालयासाठी त्यांनी यवतमाळ गाठले. येथील बाबाजी दाते कॉलेजमध्ये शिकत असताना कॉलेजच्या कट्यावर मित्राच्या घोळक्यात त्यांच्या वऱ्हाडी भाषेतील कवितांना मित्रांची दाद मिळू लागली. पुढे येथील काही कलावंतांनी स्थापन केलेल्या ऑर्केस्टामध्ये शंकर बडे आपल्या वऱ्हाडी बोलीतून खुमासदार संचालन करू लागले. आपल्या वऱ्हाडी भाषेतील कविता ऐकवून श्रोत्यांना खळखळून हसवू लागले. गणेशोत्सवात त्यांच्या कविता विशेष आकर्षण असत. 'पावसाने इचीबन कहरच केला, नागो बुडा काल वाहूनच गेला' ही वऱ्हाडी बोलीतील त्यांची पहिली कविता प्रचंड गाजली. ४० वर्षांनंतरही प्रत्येक कार्यक्रमात या कवितेचा आग्रह केला जायचा. १९७७मध्ये त्यांचा 'इरवा' हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्याची दुसरी आवृत्ती काही वर्षांपूर्वी प्रकाशित झाली. २००९मध्ये 'सगुना' व 'मुगुट' हे कवितासंग्रह प्रकाशित झाले. 'गोंदण' हा मराठी कवितेचा संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर होता. शंकर बडे यांचे कथाकथन ऐकण्यामध्ये वेगळीच मजा असे. वऱ्हाडी भाषेतील इरसाल विनोद मनसोक्त हसवत तर शेतकऱ्यांच्या व्यथा हसवत हसवत डोळ्यांच्या कडाही नकळत ओल्या करीत. थेट हृदयाशी संवाद साधण्याचे त्यांचे कसब होते. 'बॅरिस्टर गुलब्या' व 'अस्सा वऱ्हाडी मानूस' या त्यांच्या एकपात्री प्रयोगाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. 'अस्सा वऱ्हाडी मानूस'चे तीन हजारांवर तर 'बॅरिस्टर गुलब्या'चे ४००च्या वर प्रयोग केले होते. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर शेजारी राज्यातही त्यांची लोकप्रियता होती.
मातीशी नाते जोडणारा कवी गमावला : मुख्यमंत्री
शंकर बडे यांच्या निधनामुळे साहित्याचे मातीशी नाते जोडणारा आणि वऱ्हाडी भाषेचा आग्रहाने पुरस्कार करणारा कवी मराठी साहित्य विश्वाने गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 'बडे यांच्या कविता थेट काळजाला भिडणाऱ्या असल्याने त्या लोकांच्या ओठी रुळल्या. त्यांच्या लघुकथाही जगण्याचे मर्म सांगणाऱ्या आहेत. एक भाषाप्रेमी गमावला आहे,' असेही त्यांनी म्हटले आहे.
वऱ्हाडी प्रांत पोरका...
वऱ्हाडी भाषेला कवितेच्या माध्यमातून शंकर बडे यांनी एक आगळी-वेगळी लोकमान्यता मिळवून दिली होती. वऱ्हाडी भाषेतील त्यांचे काव्य जेवढे वेधक होते तेवढेच मिश्किलही होते. कविता लेखनासोबतच सर्वदूर फिरून त्यांनी मौखिक स्वरुपात काव्यमंच गाजवले. त्यांची ती कविता, त्यांचे सादरीकरण मराठी काव्य रसिक कधीही विसरू शकणार नाही.
- सदानंद देशमुख
साहित्यिक (बारोमासकार)
शंकरभाऊंच्या निधनाचे वृत्त समजताच मन सुन्न झाले. गेल्या ४० वर्षांपासूनच त्यांचा व माझा संबंध. त्यांच्या कविता वाचूनच मला कवितेची आवड निर्माण झाली. थोडेफार लिहायला लागलो. पुढे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे झाले. आम्ही दोघांनी जवळपास २००० कार्यक्रम एकत्रित केले. त्यावेळी त्यांच्याशी बराच संपर्क आला. त्यांच्या कवितांमध्ये कुठेतरी नकळत दुःख असायचे. ग्रामीण भाषेत लिहणारे ते कवी होते. त्यांच्या जाण्याने मराठी भाषेचे मोठे नुकसान झाले.
- रफी मिर्झा बेग, कवी
शंकर बडे हे उत्तम वऱ्हाडी कवीच नव्हे तर ते कथा कथनकार होते. 'बॅरिस्टर गुलब्या' या त्यांच्या प्रयोगातून वैदर्भीय जनजीवन आणि वऱ्हाडी माणसांमधील बारकावे टिपताना काळीज
चिरत जाणाऱ्या मार्मिक विनोदांची पेरणी करीत ते हा प्रयोग एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचे. कवी, कलावंत आणि माणूस म्हणूनही तितकेच समृद्ध असणारे हे व्यक्तिमत्त्व वऱ्हाडी साहित्याचा प्रांत पोरका करून गेले आहे. ही हानी कधीही भरून न निघणारी आहे.
- किशोर बळी, कवी
शंकर बडे यांच्या जाण्याने नवोदित वऱ्हाडी कवींचा आधारच कोसळला आहे. स्टेजवर कविता कशी म्हणायची, सादरी कशी करायची, लोकांच्या मनातील विषय कसे हाताळायचे, सामाजिक समस्यांना विनोदाची गुंफण कशी करायची हे शंकर बडे यांनी आम्हाला जीव तोडून शिकविले. नव्या पिढीतील वऱ्हाडी कवी घडविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या जाण्याने आपल्या घरातील एक व्यक्ती गेल्याचे असहनीय दु:ख झाले अहे.
- डॉ. राजा धर्माधिकारी
वऱ्हाडी कवी
बिना घोड्याची वरात
बिना घोड्याची वरात
बिना घोड्याची वरात
आज निंघाली कोनाची
आसू पुसाले घराचे
दाटी सग्या सोयऱ्याची
वाडी, माडी, गाडी, घोडी
कस्या वाकूल्या दावते
ज्याची मिरवली शान
थे तं इथचं राह्यते
गाद्यावरचा पावना
बास्यावरती झोपला
जसा आला एकलाचं
तसा चालला एकला
माहं माहं म्हनत रे
राहे सांगाच्याचं गोठी
आखरीच्या वखताले
पान तुयसीचं होठी
जे जे नव्हतं आपलं
त्याचीच रे केली हाव
असी मोहाच्या गाऱ्यात
तुही फसते ना नाव
तोहं राहीन रे नाव
असं काम काई कर
थेच संग तुह्या इन
बाकी नाई काई खरं
गेले संत जे सांगून
ते तं नाई काई खोटं
असे इस्टेटीच्या हून
सुदं नावचं रे मोठं
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट