उपराजधानीतील वाहतूक व्यवस्थेला सुरळीत करण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम यांच्या नेतृत्वात वाहतूक शाखा पोलिसांनी 'ड्राइव्ह' सुरू केला आहे. याअंतर्गतच आता वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अनेक ठिकाणांवरील बस व ऑटो थांबे हटविण्याचा प्रस्ताव वाहतूक शाखेने तयार केला आहे. संबंधित यंत्रणेसोबत चर्चा केल्यानंतर व नागरिकांचे आक्षेप मागविण्यात आल्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वाहतूक शाखेच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाल्या, अनेक चौकातील बस व ऑटो थांबे त्यावेळची लोकसंख्या व परिस्थितीनुसार बांधण्यात आले. मात्र आता उपराजधानीची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे हे थांब्याची जागा कमी पडत असून काही थांब्यामुळे वाहतुकीला अडचणी निर्माण होत आहेत. नुकताच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातही ही बाब समोर आली आहे.
वाढत्या अपघातांबाबत विचारणा केली असता पाटील म्हणाल्या, वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिस आवश्यक त्या उपाययोजना करीत आहेत. अपघांची २५ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार तेथे उपाययोजना करण्यात येत आहे. रिंग रोडवरील वाहतूक नवीन रिंग रोड मार्गाने वळविण्यात आली आहे. या ठिकाणी गतिरोधकही लावण्यात येण्याची शिफारस करण्यात आली आहे. महापालिकेला याबाबत कळविण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
आता वाहतूक सल्लागार समिती
वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक शाखेच्या सहा चेम्बरमध्ये वाहतूक सल्लागार समिती स्थापन करण्यात येणार आहे. यात परिससरातील प्रतिष्ठित नागरिक, महापालिकेचे अधिकारी, शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य व आरटीओच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. चेम्बरशिवाय पोलिस उपायुक्तांच्या अध्यक्षतेतही एक वाहतूक समिती स्थापन करण्यात येईल. नागरिकांनी सूचविलेल्या उपायांवर अमंलबजावणी करण्याचे काम या समितीमार्फत करण्यात येईल.
शाळा, कॉलेजसमोरील वाहतुकीची कोंडी सोडविणार
शाळा व महाविद्यालये सुटल्यानंतर त्यासमोर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होती. ही कोंडी कशाप्रकारे सोडवावी यासाठी वाहतूक पोलिसांकडून विद्यार्थी व शारीरिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.
ऑटोचालक व हॉकर्सची बैठक
रस्त्यांवर उभे राहणारे ऑटो व फुटपाथवरील हॉकर्समुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यासाठी ऑटोचालक व हॉकर्सची बैठक घेण्यात येणार असून, त्यांना याबाबत समजवून सांगण्यात येईल. त्यानंतही त्यांनी वाहतुकीचे नियम तोडले तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट