नागपूर : इंडियन सिटीझन वेलफेअर मल्टिपर्पझ सोसायटीचे सचिव व आर्किटेक्ट एकनाथ धर्माजी निमगडे (७२) यांच्या हत्येप्रकरणात तहसील पोलिसांनी गुरुवारी गँगस्टर संतोष आंबेकर याची तीन तास कसून चौकशी केली. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे संतोष याचे म्हणणे आहे. मात्र यावर पोलिसांचा विश्वास नाही.
मंगळवारी सकाळी ८वाजताच्या सुमारास एका युवकाने बेछूट गोळीबार करून निमगडे यांची हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी संशयित म्हणून पायोनिअर ग्रुपचे अनिल नायर, हिंदुस्थान ट्रॅव्हल्सचे संचालक सिद्दीकी ग्रीन लिव्हरेजचे संचालक गुप्ता या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिघांचीही पोलिसांनी कसून चौकशी केली आहे.
वर्धा मार्गावरील सोमलवाडा चौक ते हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉइन्टपर्यंत साडेपाच एकरचा भूखंडाच्या वादातून निमगडे यांची हत्या झाली. जमिनीच्या वादातून त्यांची हत्या झाल्याचे जवळपास निष्पन्न झाले आहे. मात्र त्यांची हत्या नेमकी कोणी केली हे अद्याप समोर आलेले नाही. त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीचा हात असण्याची शक्यता असून, सुपारी देऊन निमगडे यांची हत्या करण्यात आली. निमगडे यांच्या हत्येच्या तपासासाठी गुन्हे शाखा व तहसील पोलिसांसह १५ पथके तैनात करण्यात आली आहेत.मात्र मारेकऱ्यांबाबत पोलिसांना अद्यापही ठोस माहिती मिळालेली नाही. गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास संतोष आंबेकर याला तहसील पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलाविण्यात आले. पोलिस उपायुक्त एम.राजकुमार , जी.श्रीधर यांनी तब्बल तीन तास आंबेकर याची चौकशी केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट