ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या यादीत नागपूरची निवड झाली. अनेक प्रकल्प, विविध कामे यातून साकारली जाणार आहेत. नियोजनबद्धता येणार आहे. इको सिटी, एज्युकेशन हब आणि इलेक्ट्रॉनिक्स सिटी या 'ट्रिपल ई'वर भर देत नवी ओळख देण्याचा प्रयत्न नव्या प्रस्तावात आहे. त्यामुळे आगामी काळात नागपूर अत्याधुनिक सोयीने सुसज्ज असे शहर म्हणून विकसित होईल. गेल्या वेळी झालेल्या चुका दुरुस्त करून शहराच्या 'समग्र' विकासाची संकल्पना मांडल्याने ही निवड झाली.
केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी स्मार्ट सिटीची दुसरी यादी जाहीर केली. यात देशातून पाचव्या आणि राज्यातून दुसऱ्या क्रमांकावर नागपूरचे नाव आहे. गेल्यावेळी झालेल्या चुका दुरुस्त करून यंदा 'ट्रीपल -ई' हा प्रस्तावाचा केंद्रबिंदू ठरला. यात 'इको, एज्युकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स' असे स्वप्न बघितले गेले आहे. गेल्या वेळी 'गुंठेवारी' या शब्दाने घात केला होता. स्मार्ट सिटीच्या यादीत आल्याने शहराला पहिल्याच वर्षी २०० कोटी मिळणार आहेत. पाच वर्षात हजार कोटी या कामासाठी मिळतील. यात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरासाठी असलेल्या इतर योजनांचा विकास अपेक्षित धरण्यात आला आहे. या विविध योजनांचा निधी त्या योजनांतर्गत मिळणार असला तरी तो स्मार्ट सिटीचाच भाग राहणार असल्याचे सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. यावरून 'स्मार्ट सिटी' म्हणून स्वतंत्र योजनेसाठी निधी देताना इतर योजनांनाही या प्रकल्पाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे.
प्रकल्पानुसार हे होणार
शहर पर्यावरणपूरक बनविण्यावर भर
शहराला शैक्षणिक हब बनविण्याचे प्रयत्न
शहरभर सीसीटीव्ही लावून सुरक्षितता
आणण्यास प्राधान्य
एकाचवेळी शहराचा समग्र विकास
शहरातील रस्ता वाहतुकीत अधिक सुलभता
रस्त्यांवरील वाहतूक साधनांत वाढ
नागरिकांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर नियंत्रण
मेट्रो स्टेशनवरच वाहन पार्किंगची व्यवस्था
कॉलनी विकासाला प्राधान्य
झोपडपट्टीमुक्त शहराची संकल्पना
असा होईल बदल
सीमेवरील वस्त्यांच्या विकास, जीवनमान उंचावेल
अंतर्गत वस्त्यांमध्ये प्रशस्त रस्ते, पथदिवे
पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक
स्वच्छतेत सुधारणा
कौशल्य विकास केंद्राची उपलब्धता
५० किमीचा सायकल ट्रॅक, रस्त्यांच्या
बाजूने लॅन्डस्केप
नाग नदी किनाऱ्याचा परिसराचा विकास
नाग नदी किनाऱ्यावर व्यावसायिकतेला प्रोत्साहन
विकास झालेल्या भागातील जमिनीच्या
किंमती वाढतील
अनेक भागात वाणिज्यिक संकुल, कार्यालये उभी राहतील,रोजगार वाढेल
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट