म.टा. प्रतिनिधी, नागपूर
सलग एक तास एक मिनिट आणि २५ सेकंद न थांबता संविधानाच्या ३९५ कलमांची शीर्षके बिनचूक आणि मुखपाठ म्हणत उपराजधानीतील गौरी कोढे हिने शनिवारी एका नव्या विक्रमाची नोंद केली. केवळ ११ वर्षे वयाच्या गौरीच्या या अद्भुत स्मरणशक्तीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्डसने घेत त्यावर शिक्कामोर्तब केले. तिच्या या उपक्रमामुळे नागपूरच्या शिरपेचात आणखी एका मानाचा तुरा खोवला गेला आहे.
भारतीय संविधानाची ३९५ कलमे, १२ परिशिष्टे आणि २२ भाग गौरीने मुखपाठ म्हणून दाखविले. चिटणवीस सेंटर येथील मिमोसा हॉलमध्ये शनिवारी या विक्रमाची नोंद करण्यात आली. दुपारी चार वाजताच्या सुमारास गौरीने संविधानातील कलमांची इंग्रजी शीर्षके म्हणून दाखविण्यात सुरुवात केली. 'वी द पीपल...' या शब्दांनी प्रारंभ करीत तिने संविधानाची प्रास्ताविका म्हणून दाखविली. पहिली काही कलमे म्हटल्यावर गौरी अडखळली आणि विक्रम अर्धवट राहतो की काय, अशी शंका उपस्थितांच्या मनात निर्माण झाली. मात्र, त्यातून सावरत गौरीने आपल्या स्मरणशक्तीला जोर दिला आणि त्यानंतर न थांबता कलमांची धडाधड उजळणी केली. बरोबर एक तास, एक मिनिट आणि २५ सेकंदानंतर गौरी थांबताच तिची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये झाली.
या दोन्ही संस्थांच्यावतीने निरीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. सुनीता धोटे यांनी गौरीची सर्वात जलद पठणासाठी या दोन्ही विक्रमांसाठी निवड झाल्याचे जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. विभागीय आयुक्त अनुपकुमार, नागपूर कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेच्या अध्यक्षा अॅड. तेजस्विनी खाडे तसेच एमआयडीसी हिंगणाचे वाहतूक पोलिस निरीक्षक संजय पांडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. गौरीचे वडील मनीष कोढे आणि आई वैशाली कोढे तसेच तिचे इतर नातेवाइकही यावेळी आवर्जून उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. मनोज तत्वादी यांनी केले, तर निखिलेश सावरकर यांनी आभार मानले. यावेळी गौरीला डॉ. धोटे तसेच अॅड. खाडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
डोळ्यांत तरळले आनंदाश्रू विक्रम प्रस्थापित करण्यासाठी आपण संविधानाची कलमे म्हणून दाखवीत आहोत, याची जाणीव या असामान्य स्मरणशक्तीच्या गौरीला सुरुवातीपासूनच होती. त्याचा तानही या ११ वर्षीय चिमुरडीवर जाणवत होता. संविधानातील कलमे म्हणताना एका ठिकाणी गौरी अडखळली. खूप प्रयत्न करूनही पुढचे काही आठवत नाही म्हटल्यावर गौरीला रडूच कोसळले. आता विक्रमाचा हा प्रयत्न अर्धवट सोडावा लागतो की काय, असे वाटत असताना तिची आई वैशाली कोढे या मंचावर जाऊन बसल्या. आईचा हात पाठीवरून फिरताच गौरीला धीर आला. त्यानंतर, सर्व कलमा म्हणेपर्यंत वैशाली या आपल्या लेकीच्या शेजारीच बसून होत्या. विक्रम प्रस्थापित होताच आपल्या लाडक्या लेकीचे चुंबन घेत त्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
वैशाली यांनीच गौरीला स्मरणशक्ती विकासाचे तंत्र शिकवले आहे. त्या स्वतः स्मरणशक्ती विकासाचे प्रशिक्षण देतात, तर वडील मनीष कोढे हे राज्य विद्युत वितरण कंपनीत कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. वैशाली यांनी आता समाजातील इतर मुलांनाही असे प्रशिक्षण द्यावे आणि 'गौरी पॅटर्न' या नावाने उपक्रम राबवावा, अशी सूचना अॅड. तेजस्विनी खाडे यांनी यावेळी केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट