रुग्णांच्या हिताला प्राधान्य देऊन सरकारतर्फे कोट्यवधी रुपये खर्चून साहित्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या हेकेखोर वृत्तीमुळे हे साहित्य वर्षानुवर्षे कुलपात कैद करून ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुपर स्पेशालिटीत उघडकीस आला आहे. विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी सुपरमध्ये रुजू झाल्यापासून गेल्या १५ वर्षांपासून बंद असलेल्या जवळजवळ १२ खोल्या उघडल्या. त्यानंतर अलिबाबाची गुहा उघडावी तसा हा खजिना समोर आला. त्यामुळे सरकारने केलेली कोट्यवधी रुपयांची खरेदी रुग्णांपर्यंत पोहचू दिली जात नसल्याची बाबही यानिमित्ताने समोर आली आहे.
या बंद खोल्यांमध्ये गेल्या १५ वर्षांपासून कधीही न वापरलेले चार स्ट्रेचर, चार व्हिलचेअर, २० खाटा, १० साइड टेबल, कम्प्युटरचे ३० नवे कोरे मॉनिटर, एक नवा कोरा एसी, कधीही न वापर झालेल्या १५ कचरापेट्या, ४० जुने कम्प्युटर, प्रत्येकी १०० चादरींचे सहा गठ्ठे, प्रत्येकी ५० ब्लॅकेट्सचे सहा गठ्ठे असे साहित्य बाहेर आले. सुपर स्पेशालिटीतील प्रत्येक माळ्यावरील किमान पाच खोल्या बंद आहेत. त्यापैकी काही माळ्यावरील तीन खोल्या उघडल्या असता हे साहित्य वापराअभावी पडून असल्याचे पाहून डॉ. श्रीगिरीवार यांना धक्काच बसला. गेल्या १५ वर्षांपासून हे साहित्य कुलूप बंद करून ठेवण्यात आले होते. 'सुपरमध्ये समोर आलेला प्रकार खरोखर धक्कादायक आहे. रुग्णांपर्यंत हे साहित्य पोहचू दिले जात नसेल तर याहून संवेदना बधिर करणारी याहून मोठी गोष्ट असूच शकत नाही. येणाऱ्या काळात हे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही', असे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी सांगितले.
अनेक बाथरूम चोक रुग्णांच्या हितासाठी सुपरमध्ये प्रत्येक माळ्यावरील वॉर्डामध्ये बाथरूम, स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. काही समाजकंटकांनी या बाथरूममध्ये कापसाचे बोळे कोंबून ठेवले होते. त्यामुळे स्वच्छतागृहांचे आउटलेट चोक झाले. एकदा हे बाथरूम बंद झाले, की त्याच्या स्वच्छतेची कटकट नको म्हणून काही चतूर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी या बाथरूमला कायमचे लॉक लावले. असे सात बाथरूम गेल्या काही महिन्यांपासून डॉ. श्रीगिरीवार यांनी उघडावयास लावले. आणखी १० बाथरूमची हीच अवस्था आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बाथरूमदेखील वापरले जाऊ देत नसल्याचा प्रकारही यानिमित्ताने समोर आला.
बेडसीट्स, ब्लॅँकेट कुलुपात अन् पेशंटचे थंडीत हाल थंडीच्या दिवसांत रुग्णांचे हाल होऊ नयेत, यासाठी दरवर्षी शेकडो ब्लॅँकेट्सची खरेदी करण्यात येते. शिवाय रुग्णाच्या खाटेवरील बेडसीट किमान दोन दिवसांतून एक वेळा बदलावी, यासाठी चादरींची खरेदी केली जाते. हे साहित्यदेखील गेल्या कित्येक वर्षांपासून कपाटात कैद करून ठेवण्यात आले होते. कपाटांचे कुलूप उघडले असता अशा ६०० बेडसीट्स, ३०० ब्लॅँकेट्स बाहेर आले. हे साहित्य कुलपात बंद करून ठेवले जात असल्याने रुग्णांचे मात्र हाल हाल केले जात असल्याचा संतापजनक प्रकार यानिमित्ताने निदर्शनास आला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट