गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने डब्बा बाजारातील एल-सेव्हन ग्रुपसह ११ ठिकाणी छापे टाकताच कार्यालयांत असलेल्या कम्प्युटरमधील डाटा क्षणात नष्ट झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. हा डाटा परत मिळविण्यासाठी दिल्लीचे सायबर तज्ज्ञ प्रयत्नात असून, अद्याप डाटा 'रिकव्हर' झालेला नाही.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाचे पथक डब्बा बाजार प्रकरणात फरार असलेल्या आठ आरोपींचा शोध घेत आहेत. गुन्हे शाखा पोलिसांनी रवी अग्रवाल याच्या मुंबईतील एल-सेव्हन ग्रुपच्या कार्यालयावर छापे टाकले. दरम्यान, रवी अग्रवाल हा विदेशात आहे. 'या प्रकरणात आपल्याला मुद्दाम गोवण्यात येत आहे. या डब्बा बाजाराशी आपला काहीही संबंध नाही. आपण एक सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आहोत', असे रवी अग्रवाल याचे म्हणणे आहे.
डब्बा बाजाराची नोंद कम्प्युटरवर होत होती. यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर तयार करण्यात आले होते. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी कम्प्युटरवर आकडेवारी सुरू होती. कर्मचाऱ्यांनी एक बटन दाबताच कम्प्युटरमधील संपूर्ण डाटा नष्ट झाला होता. पोलिसांनी हार्ड डिस्क जप्त केल्या आहेत. कम्प्युटरचे पासवर्ड केवळ रवी अग्रवाल यालाच माहिती असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हा डाटा परत मिळविण्यासाठी दिल्लीच्या सायबर तज्ज्ञाची मदत घेण्यात येत असल्याची माहिती आहे.
मुंबईतून तीन डझन कम्प्युटर जप्त पोलिसांनी रवी अग्रवाल याच्या मुंबईतील एल-सेव्हन ग्रुपच्या कार्यालयात छापा टाकला असून या ठिकाणांहून पोलिसांनी तब्बल तीन डझन कम्प्युटर जप्त केले आहेत. तसेच सर्व्हरही जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती आहे. या सर्व्हरच्या तपासणीनंतर मोठे घबाड समोर येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट