‘थ्री इडियट’ या अतिशय गाजलेल्या चित्रपटात ‘व्हायरस’ची भूमिका करणारे अभिनेते बोमन इराणी यांना लहानपणापासून लोकांनी ‘इडियट’ म्हणून हिणवले होते. भीतीचा ‘व्हायरस’ त्यांच्या डोक्यात असा काही जाऊन बसला होता की, आपले काहीतरी चुकेल, या भीतीने ते लोकांशी बोलतच नसत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जाल पी. गिमी स्मृती व्याख्यानासाठी नागपुरात आले असताना बोमन इराणी यांनी त्यांचा जीवनप्रवास उलगडला. दीक्षांत सभागृहात झालेल्या या व्याख्यानात त्यांनी ‘द जर्नी’ विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते, तर माजी महापौर अटलबहादूरसिंग, चिराग जीमी व डॉ. पुरण मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘या जगात येण्याआधीच वडील गेल्यामुळे घरात महिलांचेच राज्य होते. त्यामुळे पुरुष नावाचा कोणी प्राणी असतो, हे शाळेत गेल्यावर पहिल्यांदा कळले. पण तोपर्यंत मनात भीतीचा व्हायरस घुसला होता. त्याने बोलण्याची ताकदच संपवली होती. तोतरा बोलत असल्यामुळे काहीतरी चुकेल, या भीतीपोटी सातव्या वर्गापर्यंत मी बोललोच नाही,’ अशी आठवण बोमन यांनी सांगितली. हॉटेल ताजमहलमध्ये रूम सर्व्हिसचे काम केल्यानंतर चिप्स, फाफडा विकण्याचा दहा वर्षे व्यवसाय केला. पण, क्रिएटिव्हिटी स्वस्थ बसू देत नव्हती. ताजमध्ये मिळालेल्या टिप्सची पिगी बँकेत जमवलेली रक्कम काढून त्यातून कॅमेरा घेतला आणि स्पोर्टस् फोटोग्राफर म्हणून काम करायला सुरुवात केली. बॉक्सिंग वर्ल्ड कपच्या काढलेल्या फोटोंनी भरपूर पैसा मिळवून दिला, असे ते म्हणाले. मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करू द्या, असे पालकांना त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिराग जीमी यांनी, तर सूत्रसंचालन मोइज हक यांनी केले. आभार पुरण मेश्राम यांनी मानले.
मामू, क्या काम किया!
एकदा रस्त्यात भेटलेल्या एका महिलेने ओळखले आणि ‘तुम मामू हो ना, क्या काम किया पिक्चर में!’, या तिच्या वाक्याने आयुष्यातली सर्वात मोठी पावती दिली. तिकीट ब्लॅकने विकणाऱ्या त्या बाईने खूप कमाई करशील, असा आशीर्वाद दिला होता. आयुष्यातल्या पहिल्याच पुरस्कार सोहळ्यासाठी एका टेलरने पायरेटेड डीव्हीडीमध्ये बघून चोवीस तासात ‘मामू’ साठी सूट बनवून दिला होता, अशी आठवण बोमन यांनी सांगितली.
नागपूरचा हिरा
‘गुंडा डॉक्टर बनता है’ या कथेवर चित्रपट तयार होणार होता. दिग्दर्शकाचे नाव राजू, भूमिकेचे नाव मुन्ना, तो गुंडा असे काहीतरी विचित्र प्रकरण होते ते. पण प्रत्यक्षात राजू म्हणजे राजकुमार हिरानीला भेटायला गेलो, तर तो नागपूरचा हिरा निघाला. ‘मुन्नाबाई...’ फ्लॉप झाला तरी लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचला. यात राजू खुश होता. पण ‘व्हायरस’ ला अनेक पुरस्कार मिळाले,’ अशी आठवण बोमन यांनी सांगितली.
दिग्दर्शक व्हायचेय
छोटे मोठे व्यवसाय केल्यानंतर वयाच्या ४० व्या वर्षी अभिनयाच्या क्षेत्रात आलेल्या बोमन यांनी अनेक उत्तम भूमिका केल्या. आता त्यांना दिग्दर्शक व्हायचे आहे. मला सर्वात ज्येष्ठ डेब्यू डायरेक्टर व्हायचंय, असे म्हणत त्यांनी एका नागपुरातील तरुणाला अॅक्टिंगमध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. ‘जा, तुझ्या मनासारखं करं’ असे ते म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट