म. टा. प्रतिनिधी, नागपूर
यंदाचा कस्तूरचंद पार्कवरील ‘रावण दहन’ कार्यक्रम वादात सापडला आहे. जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी सावध भूमिका घेतली असून, यासंदर्भात ‘पुतळे जाळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र द्या, असे स्पष्ट पत्र जिल्हा प्रशासनाने पोलिस विभागाला पाठविले आहे. एकीकडे पुतळा जाळताना पोलिसांकडून अटकाव करण्यात येतो. तर, दुसरीकडे त्याच विषयासंदर्भातील परवानगीचे पत्र द्यायचे कसे, अशा दुहेरी पेचात पोलिसही अडकले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही रावण दहनाचा कार्यक्रम एका संस्थेकडून कस्तूरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या परवानगीसाठी संस्थेकडून जिल्हा प्रशासनाकडे रितसर अर्ज करण्यात आला. या परवानगीपत्रात एकूण तीन पुतळयांना जाळण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. ‘रावण दहन’ म्हणून अशाप्रकारची परवानगी पहिल्यांदाच मागण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.
जिल्हा प्रशासनाकडून यासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रासाठी सदर पोलिस ठाण्यास पत्र देण्यात आले. पोलिस विभागाकडून ‘ना हरकत’ही देण्यात आली. मात्र, या पत्रात जाळण्याबाबतचा उल्लेख नव्हता. त्यामुळे आता नव्याने पत्र पाठविण्यात आले आहे. त्यावर ना हरकत मागविण्यात आली आहे. परवानगी वा ना हरकत देताना, तसे स्पष्टपणे नमूद करावे, असा शेरा जिल्हा प्रशासनातर्फे पोलिसांना पाठविण्यात आलेल्या पत्रात देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतीकात्मक पुतळा जाळण्यास प्रतिबंध आहे. प्रतीकात्मक पुतळा जाळण्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. त्यामुळे पोलिस यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट