सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. देवी आणि दिवा याची लोकचर्चाही परंपरागतच. घटाचा दिवा विझण्यावरून पाप-पुण्याची अघटित छाया गडद करणाऱ्या मंडळींचा वावर आपल्या अवतीभोवती असतो. या पार्श्वभूमीवर ऐन नवरात्रात एका विझत्या दिव्याने अनेकांचे आयुष्य उजळवून टाकले. त्यासाठी कारणीभूत ठरला, आजवर हा दिवा ज्यांनी जिवापाड जपला त्यांचाच दृढ संकल्प. आयुष्यभराची सावली साथ सोडून जाते तेव्हा हृदय पिळवटून निघते. वेदनांना लाभलेली जाणिवेची किनार मात्र अनेकांच्या आयुष्यासाठी आशेची ज्योत बनते. नागपुरातील घटनेने नेमका हा वस्तुपाठ दिला...
भावनेपलीकडचा विचार करणारी ही मनाची कणखरता दाखविली कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पोलिस दलातून निवृत्त झालेल्या रामेश्वर महाजन यांनी. आपली पत्नी अनंताच्या प्रवासासाठी सिद्ध झाल्याचे जाणवताच दुःखाला न कवटाळता, तिच्या अवयवदानासाठी त्यांनी केलेला खटाटोप अविस्मरणीयच. दिघोरी परिसरात राहणाऱ्या महाजन यांच्या पत्नी मंदाकिनी राहत्या घरी अचानक कोसळल्या. त्यांच्या मेंदूला मार लागला. नागपुरातील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले. एक दिवस अचानक डॉक्टरांनी निरोप दिला, ‘प्रकृती चिंताजनक आहे, कुठल्याही क्षणी बातमी येऊ शकते.’ तो क्षण जवळ येऊ लागला. परिवार हळवा झाला. त्याच क्षणी महाजनांमधील पोलिस जागा झाला. भावनांना एका कोपऱ्यात फेकून त्यांनी जणू आधीच मनाशी ठरवून ठेवलेला निर्णय आप्तांशी बोलून दाखविला... अर्धांगिनीच्या अवयवदानाचा.आयुष्यभर साथ देणारी पत्नी जगातून निवृत्ती घेण्याचे संकेत देत होती. रामेश्वर महाजन यांच्या निग्रहाने या सर्व चिंतांवर विजय मिळविला. तज्ज्ञांशी चर्चा झाली. गरजवंतांच्या आयुष्यात प्रकाश पेरण्याची उमेद त्यातून बळकट झाली. डॉ. रवी वानखेडे यांच्याशी संपर्क केला गेला. वेगवेगळ्या चाचण्या झाल्या. अधिकाधिक अवयव इतरांच्या कामी यावेत, यासाठी प्रयत्न सुरू झाले. ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये प्रक्रिया सुरू झाली. एका डोळ्यात हुरहूर, दुसऱ्यात कृतार्थता. दुःखात बुडालेले आप्त कुण्या अज्ञाताच्या हरपलेल्या सुखासाठी धावपळ करू लागले. डोळे आणि त्वचेचे दान होऊ शकते, हे डॉक्टरांनी स्पष्ट केले. गुरुवारी रात्री ही प्रक्रिया आटोपली.
देहदानाच्या संकल्पपूर्तीसाठी ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश सातपुते यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्या समन्वयातून शुक्रवारी सकाळी मंदाकिनी महाजन यांचे पार्थिव लता मंगेशकर वैद्यकीय इस्पितळाला सोपविण्यात आले. रामेश्वर महाजन यांची ही खंबीर धडपड ज्यांनी बघितली, त्यांना पोलिसी वर्दीने निवृत्त न केलेल्या माणुसकीचे अनोखे दर्शन घडले. मंदाकिनी या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नागपूर आवृत्तीतील अविनाश महाजन यांच्या मातोश्री होत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट