म. टा. प्रतिनिधी, गडचिरोली
सिरोंचा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नसल्याने संतप्त झालेल्या ६०० विद्यार्थ्यांनी शाळेसमोरच धरणे आंदोलन केल्याने खळबळ उडाली आहे.
सिरोंचा या तालुका मुख्यालयी जिल्हा परिषदेची ही शाळा आहे. तालुक्यातील सर्वात जुनी आणि मोठी अशी ही शाळा आहे. या शाळेत पाचवी ते दहावी पर्यंत विद्यार्थी शिकतात तर शाळेच्या आवारातच जिल्हा परिषदेचे विज्ञान शाखेचे कनिष्ठ महाविद्यालय आहे. जिल्हा परिषदेने या शाळेकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याने शिक्षकांची पदे रिक्त आहेत. पाचव्या वर्गात तीन शिक्षकांची गरज असताना एकच शिक्षक शिकवतात तर सहावी ते आठवीपर्यंत सहा शिक्षकांची गरज असताना एकही शिक्षक नाही. नववी ते दहाव्या वर्गासाठी पाच शिक्षकांची गरज असताना केवळ दोनच शिक्षक शिकवतात. ११ शिक्षकांची कमतरता आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापिका प्रसूती रजेवर असतानाही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यातच पुन्हा गणिताच्या प्राध्यापकांचीही बदली झाल्याची चर्चा सुरू झाल्याने विद्यार्थी संतप्त झाले. धरणे आंदोलन सुरू केले. शाळा सुरू होताच सर्व विद्यार्थ्यांनी गेट बंद करून शाळेच्या आवारात बसले. शिक्षक शाळेबाहेर आणि विद्यार्थी आत असे एकूणच चित्र होते. आंदोलनाची माहिती मिळताच पालक आणि अधिकारी शाळेत दाखल झाले. विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तोडगा निघाला नाही. अखेर मुख्याधिकाऱ्यांनी शाळेला त्वरित भेट देऊन शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
यापूर्वी याच शाळेत शिक्षकांच्या मागणीसाठी १९६५ आणि १९८०मध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट