महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी आमची जमीन घ्या, असे संमतीपत्र जिल्ह्यातील ३८ शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडे सुपूर्द केले. नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गासाठी १०६.२६ हेक्टर जमीन या शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिली आहे. प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी शेतकऱ्यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना भेटून हिंगणा तालुक्यातील भानसोली येथील नितेश कैलाशचंद्र बगडीया (सर्व्हे नं.५५/३), जिजाबाई हिवरकर (५५/१), ॲड. दिनेश नामदेव तायडे (५५/४), धनराज पांडुरंग हिवरकर व ललिता हिवरकर (५५/२), पुष्पाताई कामडे मोहगाव (५५/३), तसेच रामा वनासाखे, बंडू दौलतराव ठाकरे, देवनार गोविंदा उईके, दिवानजी मारोती मडावी या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी संदर्भातील संमतीपत्र सादर केले. यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर उपस्थित होते.
समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी हळदगाव येथील ११ शेतकऱ्यांनी संमतीपत्र दिले असून सावंगी व भानसोली येथील प्रत्येकी १२ तर वाडेगाव येथील एक अशा ३६ शेतकऱ्यांनी जिराईत जमीन असलेल्या १०३.५६ हेक्टरसाठी संमतीपत्र दिले आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या खरपी गांधी, बोरगाव येथील दोन शेतकऱ्यांनी २.७ हेक्टर क्षेत्राच्या अधिग्रहणासाठी संमतीपत्र जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना सादर केले आहे.
लॅण्डपुलिंग मॉडेलचा वापर
नागपूर ते मुंबई या दोन महानगरांदरम्यान अतिजलद वाहतूक सुलभ होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शीघ्रसंचार द्रूतगती मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला असून, महामार्गाच्या विकास व बांधणीसाठी लॅण्डपुलिंग मॉडेलचा अवलंब करण्यात येणार आहे. भूधारकांसाठी देय मोबदला आणि त्या अनुषंगिक लाभासाठी मान्यता दिली आहे. शेतकरी व भूधारकांच्या हिताचा हा निर्णय असल्यामुळे शेतकऱ्यांनीही या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शेती उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्र सादर केले आहे.
१ हजार ३४९ हेक्टर जमिनीची गरज
नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रूतगती मार्ग हा हिंगणा तालुक्यातील शिवमडका येथून सुरू होत असून हळदगाव, वडगाव येथून वर्धा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. २८.५ किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी २० गावांतील खासगी, शासकीय, वनजमीन अशा एकूण १ हजार ३४९.५२ हेक्टर जमिनीवरून हा मार्ग जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत ८१९ खातेदाराचा समावेश असून भूसंचयन प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांचा हिताचा असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कुर्वे यांनी केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट