पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताबाहेर जातात, तेव्हा त्यांच्या तोंडी सातत्याने गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी असतात. संघाच्या संस्कारात वाढलेल्या मोदींना त्याशिवाय पर्याय नाही. कारण, जगात बुद्ध आणि गांधी यांचेच नाव माहीत आहे. तेथे गोळवलकर आणि हेडगेवारांचे नाव ठावूक नाही, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी नागपुरात व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनीअर्सच्या वतीने ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाचे वितरण धम्मक्रांतीच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त करण्यात येणार आहे. या मोहिमेचा लोकार्पण सोहळा वर्धा रोडवरील डॉ. आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सबनीस प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
सबनीस यांनी ‘धम्मक्रांतीची साठ वर्षे आणि आम्ही’ या विषयावर आपले विवेचन व्याख्यानादरम्यान मांडले. यावेळी व्यासपीठावर बानाईचे एस. के. तलवारे, साहित्यिक धनराज डहाट, विजय मेश्राम, नितीन चहांदे व इतर मान्यवर उपस्थित होते. आपल्या देशात हिंदू संस्कृतीचा डंका वाजविला जातो. मात्र, मोदी बाहेर जातात, तेव्हा त्यांना बुद्धाचीच गरज पडते. पाकिस्तानच्या विरोधात आज अनेक देश आपल्याला समर्थन देत आहेत, याचे कारण हा देश बुद्धाचा आहे, हे त्यांना माहिती आहे. हिंदू राष्ट्राचा मांडला जाणारा सिद्धांत हा राजकीय दावा आहे आणि या देशातील बहुतांश हिंदूंना तो अमान्य आहे. त्यामुळे या देशातील अल्पसंख्यकांनी निर्धास्त राहावे, असे सबनीस म्हणाले.
मोदी हे काही स्वयंभू नेते नाही व त्यांचे परराष्ट्र धोरणही त्यांचे नाही. पंचशील तत्त्वावरच हे धोरण आधारलेले आहे. या जगाला बुद्धाशिवाय पर्याय नाही आणि बुद्धच तिसऱ्या महायुद्धापासून जगाला वाचवू शकतो, असेही ते म्हणाले.
धनराज डहाट, विजय मेश्राम, नितीन चहांदे तसेच एस. के.तलवारे यांनीदेखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. डहाट यांनी लिहिलेल्या बौद्धसंस्कृती, बौद्ध भारत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तीन गुरू या तीन पुस्तकांचे प्रकाशन सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले.
जात मानणारा बौद्धही ब्राह्मणच!
जो विवेकाने वागतो, मानवतावादी समजतो आणि माणसांशी एकरूप होतो तो, प्रत्येक जण बुद्धाचा अनुयायी ठरतो. डॉ. आंबेडकर हे ब्राह्मणविरोधी नव्हते. मनुस्मृती जाळण्यासाठी त्यांनी निवडलेली व्यक्ती ब्राह्मणच होती. सर्वच जातींमध्ये ब्राह्मण्य आहे. जो बौद्ध जातीवादी असेल, तो वेगळ्या अर्थाने ब्राह्मणच आहे. या देशात संविधान हाच धर्म आहे आणि बुद्ध धम्माची विकसित अवस्था म्हणजेच संविधान होय, असे संमेलनाध्यक्ष म्हणाले. बाबासाहेबांचा सर्वच समाजसुधारकांशी संवाद होता. त्यांचा संघर्षदेखील महात्मा गांधीशी नव्हता तर बॅरिस्टर गांधींशी होता. त्यांचे संपूर्ण आयुष्य अन्यायाविरुद्ध लढण्यात गेले. त्यांना जात, धर्म, संस्कृती या सर्व पातळ्यांवर हिणवले गेले. तरीही बुद्धत्व आणि भारतीयत्व या त्यांच्या चिंतनात फरक दिसून आलेला नाही. त्यांच्या बुद्धिवादाला जातीभेदाची बाधा झालेली नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट