रुग्णहिताला प्राधान्य देऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), मेयो, सुपर आणि डेंटल कॉलेजमध्ये सरकारने कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली. यातली काही उपकरणे तांत्रिक बिघाड झाल्याने बंद असतात. त्यामुळे रुग्णसेवा खंडित होते. मात्र, विभागप्रमुखांना हवे तेवढे वित्तीय अधिकार नसल्याने खर्चिक प्रक्रिया रेंगाळते. त्यामुळे उपकरणांची दुरुस्तीदेखील लांबते. यातून मार्ग काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने स्थानिक अधिष्ठाता आणि विभागप्रुखांचे वित्तीय अधिकार वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालये तसेच संलग्नित रुग्णालये व प्रशिक्षण आरोग्य पथकांच्या प्रमुखांना जिल्हा वार्षिक योजनेमधून मिळणाऱ्या निधीमधून यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदीसाठी हे अधिकार वापरता येणार आहेत.
रुग्णसेवा व विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी विभागास प्राप्त होणाऱ्या विविध लेखाशीर्षाखालील निधीतून यंत्रसामग्री व साधनसामग्री खरेदी केली जाते. नागपुरातील मेडिकल, मेयो, सुपर, दंत आदी रुग्णालयांमध्ये कोट्यवधी रुपयांची यंत्रे आहेत. त्यापैकी अनेक यंत्रे बंद पडली आहेत. काहींच्या देखभाल दुरुस्त्या रखडल्या आहेत. तर काही नवीन यंत्रे खरेदी करावयाची असल्यास अधिष्ठाता व विभागप्रमुखांना तेवढे वित्तीय अधिकार नाहीत. त्यामुळे ते खरेदी करू शकत नाहीत. यंत्रे खरेदी व व दुरुस्तीसंदर्भातील प्रस्तावसुद्धा वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे पाठवावा लागतो. ‘शासकीय काम आणि सहा महिने थांब’ या उक्तीप्रमाणे यंत्र कधी येणार आणि
दुरुस्तीसाठीचा निधी कधी येणार यासाठी ताटकळत बसावे लागते. त्यामुळे रुग्णहित डावलले जाते. ही गरज लक्षात घेता विशेष योजना तयार करण्यात आली असून, या योजनेमधून मिळणाऱ्या निधीमधून यंत्रसामग्री खरेदी व दुरुस्तीबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. तशा सूचना प्रशासनाला पाठविण्यात आल्या आहेत.
नागपुरातील सहा आरोग्य संस्था होणार बळकट
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), सुपर स्पेशालिटी रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र, आरोग्य पथक सावनेर या सहा संस्थांना आता जिल्हा वार्षिक योजनेतून विविध अत्यावश्यक यंत्रे खरेदी करता येणार आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट