मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर दिवसाढवळ्या गोळीबार करून गुंडाची हत्या केली जाते, तर बाजारातही भरदिवसा हत्येचे प्रकार गेल्या महिन्यांत घडलेत. त्यानंतर शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा चिंता व्यक्त करण्यात आली. परंतु, ही स्थिती गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने चिंताजनक होत असून गुन्ह्यांच्या तपासातदेखील नागपूर पोलिस अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वार्षिक अहवालातच नागपूर क्राइम कॅपिटल असल्याचे पुरावे मिळतात. अहवालात राज्यातील नऊ बड्या शहरांतील गुन्हेगारी दराचा आलेख देण्यात आला आहे. त्यात नागपूर शहरात सर्वाधिक दर लाख लोकसंख्येमागे ३८७ गुन्हे होत असल्याचे नमूद केले आहे. मुंबई शहराच्या तुलनेत हे गुन्हे तब्बल ८७ ने अधिक आहेत. त्यावरून कायदा व सुव्यवस्था राखण्यात मुख्यमंत्र्यांच्याच शहरातील पोलिस अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट होते.
दरम्यान, सन २०१३ च्या अहवालात नागपूर शहर गुन्हेगारी दरात दुसऱ्या स्थानी होते. परंतु, राज्यात भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यानंतर नागपुरातील गुन्हेगारी अचानक वाढल्याचे अहवालात दिसून येते. सन २०१३ मध्ये राज्यात आघाडीचे सरकार होते. त्यावेळी प्रती लाख लोकसंख्येमागे नागपूर शहरात ३३८ गुन्हे, तर मुंबईत २४२ गुन्ह्यांची नोंद झाली. राज्यातील ९ शहरांमध्ये उपराजधानी नागपूर दुसऱ्या क्रमांकावर, तर राजधानी मुंबई शहर पाचव्या स्थानी होते तसेच राज्याचा गुन्हेगारी दरदेखील १७७ इतका नियंत्रणात होता. परंतु, सन २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर राजधानी मुंबई पाचव्या स्थानावरून अचानक तिसऱ्या स्थानी आली. तेथील गुन्हेगारी दर २४२ वरून २७७ इतका झाला, तर नागपूर दुसऱ्या स्थानावरून पहिल्या स्थानी आले. येथील दर ३३९ वरून वाढून ३५८ इतका झाला. त्याचप्रमाणे ठाण्यातीलही गुन्हेगारी दरही अचानक वाढल्याचे दिसून येते. ठाणे शहर २०१२ मध्ये राज्यात आठव्या स्थानी ( २१० गुन्हेगारी दर) होते, तर २०१४ मध्ये ठाण्यातील गुन्हेगारी वाढली. ठाणे आता चौथ्या स्थानी असून, तेथील गुन्हेगारी दर वाढून २५५ इतका झाला.
आकडेवारी अशी
प्रतिलाख गुन्हेगारी दर
शहर : २०१२ : २०१३ : २०१४
नागपूर : ३३९ : ३५८ : ३८७
मुंबई : २४३ : २७७ : ३२०
ठाणे : २१० : २५५ : २६५
पुणे : २३४ : २३२ : २६०
औरंगाबाद : २९४ : २५१ : ३०५
नाशिक : २६७ : २४९ : २२३
सर्वाधिक गुन्हे नागपुरातच!
नागपूर पोलिसांनी गुन्हे कमी केल्याचा कितीही दावा केला असला, तरीही येथील गुन्हेगारीचा दर सातत्याने वाढत असल्याचे दिसून येते. २०१२ ते २०१५ या कालावधीत शहरातील गुन्हे प्रचंड वाढले आहेत. त्यात हत्या, दरोडे, चेनस्नॅचिंग आणि घरफोडी यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट