नागपूरलगत असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सफारी करावयाची असल्यास पर्यटकांना फक्त वनविभागाने नेमून दिलेल्या जिप्सींचाच वापर करावा लागणार आहे. वनविभागाच्या या निर्णयाचे पर्यटनप्रेमींकडून स्वागत होत आहे.
खासगी वाहनाने जंगलात सफारीसाठी जाण्यास आता प्रकल्प प्रशासनाने बंदी घातली आहे. ही बाब अत्यंत योग्य असल्याचे पर्यावरणप्रेमींनी म्हटले आहे. ताडोबा आणि उमरेड-कऱ्हांडलापाठोपाठ सिल्लारी येथून होणारी पेंच व्याघ्र प्रकल्पातील जंगलसफारी अलीकडे लोकप्रिय होऊ लागली आहे. या भागात वन विभागाने पर्यटकांना विविध सुविधा देण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न केले आहे. त्यामुळे, सिल्लारी प्रवेशद्वारातून पेंचमध्ये सफारीला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या आणि त्यामुळे वनखात्याला मिळणारा महसूल यांच्यात वाढ झाली आहे. या सफारीसाठी आजवर जिप्सींसह खासगी वाहनांनादेखील प्रवेश दिला जात असे. आपले वाहन घेऊन पर्यटकांना पेंच प्रकल्पात सफारी करता येत असे. मात्र, वन विभागाने आता हा पर्याय हा संपुष्टात आणला आहे.
पावसाळ्याच्या काळात व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर भागातील सफारी पूर्णपणे बंद करण्यात आली होती. या काळात पर्यटकांना केवळ बफर भागातच फिरण्याची परवानगी होती. १६ ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा पूर्ण सफारीला प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र, असे करताना पेंच व्याघ्र प्रकल्पाने खासगी वाहनांना सफारीसाठी नेण्यास मनाई करण्यात आली आहे. सिल्लारी प्रवेशद्वारातून आता फक्त वनखात्याने मान्यता दिलेल्या जिप्सींनाच सफारीसाठी परवानगी दिली जाणार आहे. इतर ठिकाणांहून मात्र खासगी वाहनेदेखील जाऊ शकतील, असे वन विभागातील सूत्रांनी सांगितले.
सिल्लारी येथून जाणाऱ्या जिप्सी या पेंच प्रकल्पाच्या आजूबाजूच्या गावांमधील लोकांच्याच राहणार आहेत. या सफारीसाठी जाणाऱ्या चालकांची नोंदणीही वन विभागाने केली आहे. त्याचप्रमाणे गाडीबरोबर जाणाऱ्या गाइडसलाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. केवळ जिप्सी आत जाऊ देण्याच्या निर्णयामुळे स्थानिकांना जास्त रोजगार मिळू शकेल. त्यामुळे ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट