भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपने नागपुरातील नगरसेवक परिणय फुके यांना उमेदवारी दिली. काँग्रेसकडून आमदार गोपालदास अग्रवाल यांचे चिरंजीव प्रफुल्ल यांच्यासाठी जोर लावण्यात येत असल्याने विद्यमान आमदार राजू जैन यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहण्याचे संकेत आहेत.
आमदार राजू जैन यांचा कार्यकाळ येत्या ५ डिसेंबरला संपणार आहे. त्यासाठी १९ नोव्हेंबरला मतदान होत आहे. मतदारसंघात ३९५ मतदार असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजपकडे असलेल्या संख्याबळात फार फरक नाही. भाजपकडून परिणय फुके यांच्या नावाची आठवडाभरापासून चर्चा सुरू होती. त्यावर शनिवारी शिक्कामोर्तब झाले. मूळ काँग्रेसचे असलेले फुके यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली व निवडून आले. महापालिकेत भाजपने स्थापन केलेल्या शहर विकास आघाडीत ते सहभागी झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपुरातून त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर दावा केला होता. परंतु, पक्षाकडून प्रतिसाद मिळाला नाही.
भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य मतदारसंघात यावेळी राजू जैन यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्र्रफुल्ल पटेल यांना शह देण्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न आहेत. त्यामुळे आमदार गोपालदास अग्रवाल यांचे चिरंजीव प्रफुल्ल अग्रवाल यांच्या उमेदवारीसाठी जिल्ह्यातील नेत्यांचे प्रयत्न आहेत. तसा ठरावदेखील संमत केला. काँग्रेसचे प्रभारी नितीन राऊत यांनीदेखील हायकमांडकडे आग्रही भूमिका घेतली आहे.
भाजपने गेल्यावेळीदेखील नागपूरचे संदीप गवई यांना उमेदवारी दिली होती. यावेळी परिणय फुके यांना संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत चुरस येण्याची शक्यता आहे. बहुजन समाज पक्षासह अन्य पक्षांनी या निवडणुकीबाबत उमेदवारांचे संकेत दिलेले नाहीत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट