Twitter: @AbhiKhuleMT
नागपूर : पाचव्या पणतीची वात तिनं पेटवली अन् दहा बाय दहाच्या त्या खोलीसमोरील उंबरठ्यावर बसली. चाहूल लागताच सावरली, डोळ्यानंच ‘चलण्याचा’ इशारा केला. तिला म्हटलं, ‘क्यूँ, दिवाली नही मनाते क्या?’ म्हणाली, ‘बैठना हैं क्या? तुम बैठे तो होगी ना दिवाली.’ तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तोवर, दोघेजण आले. डोळ्यांत इशारे झाले. खोलीचं दार बंद झालं... बाहेर प्रकाशसण साजरा होत असताना ती खोली मात्र ऐन दिवाळीत अंधारात गुडूप झाली... वृथा प्रकाशाच्या आशेनं!
गंगा-जमना... शहरातील बदनाम तरीही प्रत्येकाच्या औत्सुक्याचं, अप्रूपतेचं कारण असलेली वस्ती. काहीजण तिथं थ्रिल अनुभवण्यासाठी जातात, काही गरज म्हणून तर काही उगाच चक्कर म्हणून. सध्या शहरात दीपावलीच्या मांगल्यानं वातावरण भारलं आहे. प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रकाशाचा हा सण साजरा करतो आहे. अशावेळी, या बदनाम वस्तीतील दिवाळी कशी साजरी होत असेल, याबाबत उत्सुकता होतीच. तीच उत्सुकता लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला देहाच्या या बाजारात घेऊन आली. वरवर वस्ती शांत वाटत होती. गल्लीत प्रवेश केला तेव्हा अनेक खोल्यांची दारे कुलूपबंद दिसली. थोडं आत जाऊन पाहिलं, तेव्हा काही खोल्यांसमोर दिवे मिणमिणत होते. काहीजणी उभे राहून तर काहीजणी उंबरठ्यावर बसून गिऱ्हाईके शोधत होत्या. ‘ऐ सुन, चल ना’, अशी आर्जवे सुरू झाली. त्याचवेळी तुळशी वृंदावन असलेल्या खोलीसमोर पावले थबकली. मोठ्या आशेनं पाच पणत्या पेटवल्या तिनं त्या वृंदावनासमोर. तिथंच एक सत्यही कळलं... लक्ष्मीपूजनालाच जास्त चालतो हा बाजार. त्यांचा दिवा विझतो, तेव्हाच साजरी करू शकतात त्या दिवाळी.
गिऱ्हाईक बसवून झालं, अन् चंदा (नाव बदलले) बाहेर आली. तिच्याशीच संवाद साधावा, अर्थात तिचा धंदा डिस्टर्ब न करता, असं ठरवलं. तोवर उत्सुकतेपोटी इतरजणीही तिथं गोळा झाल्या. ‘क्या हैं जी साहब... ना ‘बैठ’ रहे ना जा रहे...’ असे प्रश्न कपाळावर आठ्या आणून उपस्थित झाले. तोवर यातील अनेकींचं नेतृत्व करणारी कलादीदी उपस्थित झाली. त्या सर्वांना पुन्हा एवढंच विचारलं... ‘आप दिवाली नही मनाती?’ कोपऱ्याकोपऱ्यांत उभ्या असलेल्या अन् या वारांगनांना नखशिखांत न्याहाळणाऱ्या पोरांच्या टोळक्यांकडे हात दाखवून पुन्हा त्याच धाटणीचं उत्तर आलं... ‘यही तो हैं हमारी दिवाली.’
गंगा-जमनात किमान पाच ते सहा हजार मुली व महिला या धंद्यात आहेत. जवळपास सर्वच बाहेरच्या राज्यांतील. त्यातील अनेकजणी आपापल्या कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांच्या गावी निघून गेलेल्या. इथे उरल्या, ज्यांना कुटुंबात स्थान नाही किंवा ज्यांना कुटुंबेच नाहीत. शिवाय, दिवाळीत ग्राहकी जास्त असते, या आशेनं थांबणाऱ्याही अधिक होत्या. कलादीदी म्हणाली, ‘दिवाली की पूजा तो हम करते ही हैं... दिया तो जलाते हैं. हमारे किस्मत का दिया कब जलेगा ये तो भगवान ही जाने.’
‘ऐसा क्यूं’, असं विचारताच रोझी म्हणाली, ‘पिछले साल की दिवाली बहोत खराब गयी. दिये जले ही नही. पुलिस ने बस्ती उजाडने की ठान ली थी. भगवान भरोसे बच गये. इस साल कम से कम दिये तो जले.’
तोवर तीन-चार चिमुकले हातात फुलझड्या घेऊन तिथं बागडत आले अन् आपापल्या आयांना बिलगले. तेवढ्यात ‘मौसी’चा विशिष्ट हेलमध्ये आवाज आला, ‘ऐ चंदा... रोझी. ये आये हैं... बिठा ले इन को...’
चंदा अन् रोझी दोघी उठल्या. चंदानं मघाशी पेटवलेल्या पाच पणत्या पाहिल्या. एक विझत आली होती. तिनं हलकेच वात पुढे सरकवली अन् आणखी तेल घातलं पणतीत. वात पुन्हा पेटली. नंतर तिनं गिऱ्हाईकाला आत घेतलं... खोली पुन्हा अंधाराच्या स्वाधीन झाली.
बच्चे तो बचे!
पोलिसांविषयी रोष आणि धास्ती दोन्ही आहे त्यांच्या मनात. अल्पवयीन मुलगी ज्यांच्या खोलीत आढळली, त्यांच्यावर कारवाई करा तुम्ही. त्यासाठी पूर्ण वस्तीत घुसून इतरजणींच्या पोटावर लाथ का मारता, असा त्यांचा सवाल आहे. आम्हाला आधारकार्ड, मतदार कार्ड फक्त तुमची व्होटबँक वाढविण्यासाठी देता का, असा संतप्त प्रश्नही त्या विचारतात. ‘अच्छा, बुरा, बेवडा, गवार सब को हम झेलते हैं. एक तरह से समाज की औरते और बच्चीयों को हम बचाते हैं. लेकिन हमारे पेट पर ही लात मारी जा रही हैं. हमारी जिंदगी तो किस्मत ने खराब कर दी. लेकीन, हमारे बच्चों के साथ ऐसा ना हो, यही इच्छा हैं...’ दीदी म्हणाली. आपल्या पोरांसाठी खूप स्वप्नं आहेत त्यांची. आपल्या मुलींना या धंद्यात आणायचं नाही, यासाठी अनेकींचा आटापिटा सुरू आहे. म्हणूनच, अनेकींनी आपल्या मुलींना बाहेरच ठेवलंय या दलदलीपासून. त्यांना चांगलं शिक्षणही देत आहेत. मात्र, तिचं कुठं लग्न करायचं झालं, तर वेश्येची मुलगी म्हणून तिचा स्वीकार होईल का, हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करतोच.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट