मानवी जीवनात वैद्यकीय शास्त्राने क्रांती केली आहे. त्यामुळे मानवी अवयवांचे प्रत्यारोपण सुलभ झाले आहे. आपल्या अवयवदानातून एखाद्याचे जीवन सुकर होऊ शकते, यासाठी ' मरावे परी अवयवरुपी उरावे...'या उक्तीनुसार चंद्रपुरात तब्बल १३३ जणांनी अवयवदानाचा संकल्प केला. वाढदिवसानिमित्तची भाषणबाजी टाळून अवयव दानाच्या संकल्पसभेतून नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केला.
प्रदूषण, अनियमित जीवनशैली, दुर्धर आजार, अपघातांमुळे निकामी होणाऱ्या अवयवांमुळे आयुष्यभर चिंता करीत जगणाऱ्या रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी येथील व्यंकटेश्वर स्वामी मंदिर ट्रस्ट आणि आयएमए सरसावले. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या पुढाकाराने चंद्रपुरात अवयवदानाच्या विषयावर जनजागृतीसाठी शुक्रवारी दाताळा भागातील बालाजी मंदिराच्या प्रांगणात चर्चासत्र पार पडले. कार्यक्रमाला नागपूरचे अॅड. अनिल किलोर, डॉ. पिनाक दंदे, डॉ. राहुल पंडित, मोहन फाउंडेशनच्या कांचन शेवडे, चंद्रपूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रमोद बांगडे, सचिव डॉ. पीयुष मूत्यालवार, डॉ. शंकर अंदनकर उपस्थित होते.
अवयवदानासाठी स्त्री-पुरुष असा कोणताही भेद नसून मरणोपरांत २४ तासांत अवयवदान प्रत्यारोपण प्रक्रिया करून जीवनदान देता येते. अशी माहिती डॉ. पिनाक दंदे यांनी दिली. अवयवदान करणाऱ्यांना कर सवलत किंवा अन्य सूट दिल्यास ही चळवळ वाढेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अवयवदान हे खरे इश्वरी कार्य असल्याची भावना अॅड. किलोर यांनी व्यक्त केली. राज्यात एक ते दीड लाख रुग्ण किडणी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. ५० हजारांवर रुग्ण हृद्यविकाराने पीडित आहेत. त्यांच्यासाठी ही संकल्पना रुजवावी, असे आवाहन मुंबईच्या फोर्टस हॉस्पिटलचे डॉ. राहुल पंडित यांनी केले.
माजी खासदार नरेश पुगलिया यांनी अवयवदानाबद्दल आवाहन करीत हृदय, किडनी, यकृत या अवयवदानाची सर्वप्रथम नोंदणी केली. प्रास्ताविक गजानन गावंडे यांनी केले. नितीन पुगलिया यांनी संचालन केले तर डॉ. महावीर सोईतकर यांनी आभार मानले. 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक श्रीपाद अपराजित, ज्येष्ठ पत्रकार गजानन जानभोर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अवयव रूपाने जिवंत रहा : पुगलिया
मानवी जीवनात अवयवदान हे श्रेष्ठदान आहे. माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अग्निसंस्कार व दफनविधी करतो. त्यामुळे माणसाचा कोणताही अवयव उपयोगी पडत नाही. मात्र मरणोपरांत अवयवदानाची मानसिकता बाळगल्यास आपण पिढ्यानपिढ्या जिवंत राहू शकतो, असे भावनिक आवाहन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट