नागपुरातील प्रथितयश व्हायोलिन वादक शिरीष भालेराव यांचे सुरेल व्हायोलिन वादन आणि पुण्याच्या गायिका डॉ. रेवा नातू यांच्या सुमधुर गायनाने पं. कासलीकर संगीत समारोहाला शुक्रवारी प्रारंभ झाला.
सप्तकच्या वतीने दरवर्षी पं. मनोहर उपाख्य बाबासाहेब कासलीकर स्मृती संगीत समारोहाचे आयोजन करण्यात येते. यंदा महोत्सवाचे नववे वर्ष आहे. सायंटिफिक सभागृहात होणाऱ्या या समारोहात लोकप्रिय व युवा गायक-वादकांचा सहभाग राहतो. खाँ साहेब बडे गुलाअली यांचे शिष्य राहिलेल्या पं. बाबासाहेब कासलीकर खाँ साहेब विलायत हुसेन, अजमत हुसेन खाँ, पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडून संगीताचे धडे घेतले होते. विदर्भ गंधर्वची उपाधी मिळालेल्या बाबासाहेब कासलीकरांच्या स्मृतींना सप्तकच्या वतीने दरवर्षी उजाळा दिला जातो. कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका मंजूश्री सोमण, आचार्य विवेक गोखले, सप्तकचे संस्थापक सदस्य श्रीराम काणे, आयकर अधिकारी राजीव रानडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्हायोलिन वादक शिरीष भालेराव यांचा व्हायोलिन वादनाने समारोहाला प्रारंभ झाला. राग रागेश्रीचे व्हायोलिनवर आर्त सूर उमटले. आलाप, जोड आणि विलंबीत एकतालातील बंदीश सादर करत त्यांनी रसिकांच्या मनाची पकड घेतली. नंतर त्यांनी राग देस सादर केला. त्यांना तबल्यावर राजेश मौंदेकर व व्हायोलिनवर अथर्व भालेराव यांनी साथ दिली. पुण्याच्या गायिका डॉ. रेवा नातू यांचे नंतर गायन झाले. डॉ. रेवा या तबला वादक विनायक बुवा फाटक यांच्या कन्या असून एसएनडीटी विद्यापीठाच्या एमए (संगीत) आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या डॉक्टरेट आहेत. त्यांनी राग छाया नट व नाट्यगीते सादर केली. तबल्यावर संदेश पोपटकर, संवादिनीवर श्रीकांत पिसे आणि तानपुऱ्यावर श्रद्धा अत्रे यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उदय गुप्ते
यांनी केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट