बौद्ध व मागासवर्गीय सेवा संस्था नागपूरतर्फे आयोजित राजस्तरीय सुराज्य दौड आज, शनिवारी होणार आहे. अंबाझरी मार्गावरील बोधिसत्व चौक (माटे चौक) येथून प्रारंभ व त्याच ठिकाणी समाप्त होणाऱ्या या स्पर्धेत विजेतेपदासाठी महाराष्ट्रातील प्रतिभावंत धावपटूंनी प्रवेश निश्चित केला आहे.
महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या अधिपत्याखाली व नागपूर जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत खुल्या गटात महिला व पुरुषांसाठी २१.०९७ किलोमीटर अंतराची अर्धमॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. याचबरोबर १८ वर्षांखालील मुला-मुलींसाठी ५.७ किलोमीटर अंतराची आणि १४ वर्षांखालील मुला-मुलींसाठी ४.४ किलोमीटर अंतराची दौड स्पर्धा घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यावर्षी सर्वसामान्य नागरिकांसाठी सद्भावना दौड स्पर्धा होणार आहे. अर्धमॅरेथॉन स्पर्धेत चंद्रपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशीम, नाशिक, ठाणे, सातारा, पुणे व मुंबई येथील प्रतिभावंत धावपटूंनी प्रवेश निश्चित केला आहे. स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून, नागपूर जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी स्पर्धेचे तांत्रिक व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
वाशीम जिल्हा संघटनेचे सहसचिव चेतन शेंडे निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. स्पर्धेत एकूण ३ लाख रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. अर्धमॅरेथॉनमध्ये महिला व पुरुष गटातील विजेत्याला २५ हजार रुपये रोख व चषक आणि दुसऱ्या ते पंधराव्या स्थानावरील धावपटूंनाही रोख पुरस्कार देण्यात येईल. १८ वर्षांखालील गटात विजेत्याला ५ हजार रुपये व १४ वर्षांखालील गटातील विजेत्याला ३ हजार रुपयांचे रोख पुरस्कार व चषक आणि दुसऱ्या ते पंधराव्या स्थानावरील धावपटूंनाही रोख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नवीन विक्रम प्रस्थापित करणार्या धावपटूंना विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर नवीन विक्रम करणाऱ्याला ५ हजार, राज्य स्तरावर नवीन विक्रम करणाऱ्याला १० हजार आणि राष्ट्रीय स्तरावर नवीन विक्रम नोंदविणाऱ्याला २५ हजार रुपयांचे विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येतील. बक्षीस वितरण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव प्रल्हाद सावंत, नागपूर जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे आजीवन अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे आदी उपस्थित राहतील.
असा आहे मार्ग
दौड स्पर्धेचा मार्ग (२१.०९७ किलोमीटर) : बोधिसत्व चौक (प्रारंभ) - श्रद्धानंद पेठ चौक-मधुमती नर्सरी-एलएडी कॉलेज चौक-नक्षत्र बिल्डिंग-धरमपेठ सायन्स कॉलेज-सुभाषनगर चौक-हिंगणा टी-पॉइंट-अनसूया माता कार्यालय-पडोळे हॉस्पिटल-प्रतापनगर चौक-खामला चौक-ज्युपिटर कॉलेज-अजनी चौक- मध्यवर्ती कारागृह--शासकीय आयटीआय कॉलेज-अण्णाभाऊ साठे चौक-काचिपुरा चौक-अलंकार टॉकीज चौक-चिल्ड्रेन पार्क-बोले पेट्रोल पंप-लॉ कॉलेज चौक-रवीनगर चौक-भारतनगर चौक-विद्यापीठ कॅम्पस-अंबाझरी गार्डन-आयटी पार्क-बोधिसत्व चौक.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट