म.टा. प्रतिनिधी, नागपूर
गांधीबाग येथे चहाची टपरी चालवणाऱ्या पवन दांदले या तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत करून महिनेवारी असलेल्या ग्राहकांकडून चेकद्वारे पेमेंट स्वीकारणे सुरू केले. त्याच्या या प्रयत्नांना परिसरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उत्साह वाढवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आणण्याचे जाहीर केले. त्यानंतर सर्वत्र गोंधळ उडाला. लहान विक्रेत्यांसमोर संकट उभे ठाकल्याची चर्चा सुरू झाली. अशातच डागा हॉस्पिटलजवळील ईलेक्ट्रिकल व्यवसायी कैलास कोटवानी यांनी पंतप्रधानांच्या घोषणेनंतर अधिकाधिक व्यवहार बँकेद्वारे व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी पहिला प्रयोग चहा विक्रेता पवन दांदले याच्याकडे केला. कोटवानी यांच्याकडे येणाऱ्यांसाठी तो नियमित चहा करतो. त्यातून त्यांनी पवनला प्रोत्साहन दिले.
चेकद्वारे पेमेंट स्वीकारणे देशहिताचे आहे. लहान व्यावसायिकांनीदेखील त्यास हातभार लावल्यास देशाच्या विकासात योगदान राहील, असे पवनला सांगताच त्याने लगेच प्रतिसाद देत चेकद्वारे पेमेंट स्वीकारण्यास सहमती दर्शवल्याने कोटवानी यांनी सांगितले. सर्वांनी बँकेतून व्यवहार केल्यास सरकारला अपेक्षित करत मिळेल आणि व्यवहारदेखील पारदर्शक होतील. कोण कसा प्रतिसाद देतो याची पर्वा न करता जनजागरणाचे अभियान असेच सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट