सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील एनसीआरमध्ये सर्व फटाक्यांचे परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच, यात काय सुधारणा करता येतील अशी विचारणा सरकारला केली आहे. एकीकडे फटाकेविक्रीवरच बंदी असताना नागपुरात मात्र रस्त्यांवर रितसर फटाके फोडण्यासाठी शुल्क आकारले जात आहे. लग्न मिरवणुकीत फटाके फोडण्यासाठी मनपा ३०० रुपये शुल्क आकारत आहे. तर, लग्न मिरवणूक नियमाने व शिस्तीत जावी, यासाठी पोलिसांनी परवानगी आवश्यक केली आहे. परवानगीशिवाय रस्त्यांवरून लग्न मिरवणूक निघत असल्यास पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्याचा बडगाही उगारला जात आहे.
कलम ३३ (१) व कलम ३६ मुंबई पोलिस अधिनियमाद्वारे ही परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. यानुसार मिरवणुकीच्या कालावधीत एकूण नऊ नियमांचे पालन करणे अत्यावश्यक केले आहे. यानुसार लग्नवरातीच्या मिरवणुकीची परवानगी घेणाऱ्यास स्वत: प्रथमपासून शेवटपर्यंतच्या प्रक्रियेदरम्यान हजर राहणे आवश्यक आहे. लग्नवरातीची परवानगी ही दिलेल्या वेळेपुरतीच मर्यादित राहणार आहे. लग्नवरात ही रस्त्याच्या डाव्या बाजूने नेण्यात यावी, जेणेकरून रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही. कोणतेही गैरसोय होवू नये, यासाठी वरात शिस्तबद्ध काढण्याची जबाबदारी परवानगी घेणाऱ्यावर असेल. लग्नवरातीमध्ये शासकीय कामकाजात अडथळा निर्माण होणार नाही, याची आयोजकांकडून दक्षता घेणे आवश्यक राहणार आहे. काही तक्रार प्राप्त झाल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. वरातीमध्ये फटाके फोडताना रस्त्यावरील रहदारीला बाधा पोहोचणार नाही आणि लोकांना काही इजा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे नियमात नमूद आहे. यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाची परवानगी घेऊन ३०० रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे. हा शुल्क रस्यावर होणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी योग्य ते साफसफाई शुल्क म्हणून आकारण्यात येत आहे. ५०० मीटर अंतरापर्यंत फटाके फोडण्यास परवानगीनुसार मुभा असेल. यासोबतच लग्नवरातीमध्ये ४५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके फोडण्यास मनाई असेल. ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम २०००च्या २(४) अन्वये ध्वनिप्रदूषण नियमाची अंमलबजावणी करण्याची सक्ती परवानगी घेणाऱ्यावर अवलंबून राहणार आहे. दिलेल्या सर्व अटींचे व नियमांचे पालन करण्यास तयार असेल तरच लग्नवरातीसाठी परवानगी दिली जाते. शिवाय, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून देण्यात आलेली परवानगी केव्हाही रद्द करण्याचे अधिकारही पोलिसांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट