म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये दारूबंदीची मागणी सुरू झालेली असताना नागपुरात मात्र मद्यसेवन करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचेच चित्र आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंत मद्यसेवन परवाना घेणाऱ्यांची संख्या लाखावर गेली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकारात उत्पादन शुल्क विभागाने ही माहिती दिली आहे. २०१३- २०१४ या वर्षात नागपूर शहरात २४,७३५ जणांनी मद्यसेवन परवाने घेतले होते, तर त्यानंतरच्या वर्षात ही संख्या वाढून ३७,५५३ झाली. २०१५-१६ या वर्षात १ लाख ९ हजार ३८७ परवाने देण्यात आले आणि २०१६-१७ मध्ये ३० ऑक्टोबरपर्यंत १ लाख ९ हजार ४६१ जणांनी मद्यसेवनाचा परवाना घेतला आहे. त्यामुळे एक तर मद्यपींची संख्या वाढली आहे किंवा परवाना घेऊन मद्य पिण्याच्या वृत्तीत वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०१५ ते ऑक्टोबर २०१६ या वर्षभरात शहरात नव्या ५० बीअर बारना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या शहरात २८१ बीअर बार आहेत.
दरम्यान, ग्रामीण भागात स्वतःकडे देशी मद्य बाळगण्याच्या नियमात अलीकडेच सरकारने बदल केला आहे. २९-११-१६ पासून वैयक्तिक मद्यसेवन परवान्यावरील देशी मद्य बाळगण्याची क्षमता प्रति महिना २ युनिट करण्यात आली आहे. १ युनिट म्हणजे १००० मि.लि. यापूर्वी ही क्षमता प्रतिमहिना १२ युनिट एवढी होती. ग्रामीण भागात या तरतुदीचा गैरवापर होत असल्याचे लक्षात आल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा लागू असून, मद्यसेवनाकरिता ‘एफएल एक्ससी’ परवाना आवश्क आहे. या परवान्यासाठी १ वर्षाचे १०० रुपये व आजीवन परवान्यासाठी १ हजार रुपये आकारले जातात. मधल्या काळात परवाना दाखविल्याशिवाय मद्यविक्रीच्या दुकानातून मद्य न देण्याचीही घोषणा झाली होती. मात्र, या नियमाची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचे पुढे आले. ज्यांनी परवाना काढलेला नाही, त्यांना दुकानातच तात्पुरता परवाना देण्याची सोय करण्यात आली होती. देशी मद्यासाठी २ रुपये, तर विदेशी मद्यासाठी ५ रुपये असे एक दिवसीय परवान्याचे शुल्क ठरविण्यात आले. मात्र, या तात्पुरत्या परवान्यांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. कारण मद्य घेताना आपले नाव सांगून आधी परवाना घ्यायचा व मग मद्य घ्यायचे, लोकांना रुचलेले दिसत नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट