सरकारने विरोधकांसाठी आयोजित केलेल्या चहापानाकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. ज्या नागपुरात हे चहापान होत आहे, तेथील जनतेचे चहापान आरोग्यासाठी किती घातक आहे, याच्याकडे मात्र कुणाचेच लक्ष नाही. चहासाठी लागणाऱ्या पत्तीमध्ये खुलेआम भुसा मिसळविला जातो, पहाटेच्या अंधारात दुधामध्ये पाण्याची भेसळ होते त्याकडे कुणाचेच लक्ष नाही. चहा तर सोडा नागपुरातील काही भागात कुठे लाल तर कुठे पिवळ्या पाण्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. सरकारच्या चहापानाच्या निमित्ताने नागरिकांच्या चहापानाची दखल घेतली जावी, हीच अपेक्षा!
मुख्यमंत्र्यांच्या चहापानाच्या निमित्ताने सामान्यांच्या चहापानाचा आणि पाण्याचा आढावा घेतला असता ‘मटा’ला अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाला. स्वस्त आणि मस्त म्हणून विकल्या जाणाऱ्या खुल्या चहापत्तीत मोठ्या प्रमाणावर भेसळ होते. ५० किलोच्या चहापत्तीच्या बोऱ्यात पाच किलो भुसा असतो, अशी धक्कादायक माहिती विक्रेत्यांकडूनच मिळाली. असा ‘भुसा कम चाय’ विकणारे १५ हून अधिक एजंट नागपुरात आहेत. काही वेळा तर ब्रँडेड चहाच्या पुड्यातही बनावट पत्ती मिसळवली जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
पहाटेच चालतो काळा धंदा
मोठमोठ्या ब्रँडेड कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्या पहाटे तीन वाजता प्राप्त करणे, त्या विशिष्ट ठिकाणी घेऊन जाणे, पिशव्यातील किमान ३०० एमएल दूध इंजेक्शनच्या साह्याने काढून घेणे आणि त्यात पाणी भरणे हा धंदा नागपुरात खुलेआम सुरू आहे. दुधाच्या वापरलेल्या पिशव्या विकत घेणारी टोळी नागपुरात आहे, ती १ रुपया प्रतिपिशवी या दराने पिशव्या विकते. त्यात इंजेक्शनने काढलेले दूध पाणी मिसळून भरले जाते. पिशव्यांचे पॅकिंग करणारी मशिन अवघ्या हजार रुपयांच्या आत उपलब्ध आहे, त्याद्वारे भेसळयुक्त दूध नागरिकांच्या दारापर्यंत पोहचविले जाते. दुधात युरीया मिळविण्याचा प्रताप तर वेगळाच आहे.
पिवळे पाणी
पाण्याला रंग नसतो, असे म्हणतात नागपुरातील काही वस्त्यांमधील पाणी रंगीत आहे. मध्य आणि उत्तर नागपुरातील नारी दीक्षितनगर, मुस्लीमपुरा, रामनगर, मिरचीपुरा, चामारगली, नाईक तलाव, पेवठा या भागातील नागरिकांना विचारा, त्यातील काही लोक पाण्याचा रंग पिवळा तर काही लाल आहे असं सांगतील. ज्या भागात महापालिकेचे नेटवर्क नाही, जिथे पाणी बोअरद्वारे घेतले जाते, त्या भागाच्या पाणी तपासणीत आरोग्यास हानीकारक बाबी आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे. धक्कादायक म्हणजे जो गोरेवाडा तलाव आपल्या शहराला पाणीपुरवठा करतो, त्याला मिळणारा खडकनाला अत्यंत प्रदूषित आहे. याची तक्रार भाजपचेच नगरसेवक जगदीश ग्वालबंशी १९९७ पासून करीत आहेत, त्याची दखल भाजपची सत्ता असलेली महापालिका केव्हा घेणार ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट