लग्नास नकार दिल्याने मेहुणीवर एकामागून एक सपासप वीसपेक्षा अधिक वार करणाऱ्या सैतानाला पानठेलाचालकाने वेळीच आवरल्याने मोठा अनर्थ टळला. मेहुणी मेयो हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असून, पानठेला चालकाच्या हिमतीचे परिसरात व पोलिस दलात कौतुक होत आहे. वंदना दादाराव कावरे (२५, रा. झिंगाबाई टाकळी) असे जखमीचे तर सिद्धार्थ ज्योतीराव आवळे (४०, रा. फरस) असे हल्लेखोराचे नाव आहे. त्याची ६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. तो मजुरी करतो.
तीन वर्षांपूर्वी वंदना व सिद्धार्थ याची पत्नी मोपेडने जात होते. मोपेड वंदना चालवित होती. जरीपटका भागात मोपेड खड्ड्यातून उसळल्याने सिद्धार्थची पत्नी जखमी झाली. मेयो हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूस वंदनाच कारणीभूत असल्याचे समजून सिद्धार्थ तिला त्रास देत होता, लग्नाची गळ घालत होता. मात्र, वंदना त्याला टाळत होती. दोन महिन्यांपूर्वी वंदनाचे साक्षगंध झाले. त्यामुळे सिद्धार्थ संतापला होता. त्याने तिला संपविण्याची योजना आखली. शुक्रवारी दुपारी वंदना ही मोपेडने जात होती. झिंगाबाई टाकळी भागाती झेंडा चौक भागात दबा धरून बसलेल्या सिद्धार्थने तिला अडविले. तिच्यावर सत्तूरने सपासप वार करायला सुरुवात केली. वीसपेक्षा अधिक वार त्याने तिच्यावर केले. समोरीलच पानठेचालक विजय गावंडे हे वंदना यांच्या मदतीसाठी धावले. त्यांनी सिद्धार्थला पकडले. अन्य नागरिकही धावले. मात्र, नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. सिद्धार्थच्या अंगात सैतान संचारला होता. मला सोड नाही तर तुलाही ठार मारेल, अशी धमकी तो विजय यांना देत होता. मात्र, विजय यांनी त्याला घट्ट पकडून ठेवले होते. घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जी. पी. राऊत ताफ्यासह तेथे पोहोचले व सिद्धार्थला अटक केली. जखमी वंदनाला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वंदनाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
दरम्यान, राऊत यांनी शनिवारी सिद्धार्थला न्यायालयात हजर केले. सिद्धार्थने सत्तूर कोठून आणला, त्याने वंदनावर नेमका कोणत्या कारणाने हल्ला केला याची माहिती घ्यायची असून, या प्रकरणाचा सविस्तर तपास करायचा असल्याने सिद्धार्थ याची पोलिस कोठडी देण्याची मागणी राऊत यांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने सिद्धार्थ याची ६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.
तर त्याचा मुडदा पडला असता
सिद्धार्थ याच्या अंगात सैतान संचारला. पानठेलाचालक विजय यांनी त्याला पकडले. मात्र, अन्य नागरिक त्याच्या हातातील सत्तूर बघून घाबरले. काहींनी हातात काठ्या धरल्या. मात्र, विजय यांनी नागरिकांना संयमाने घेण्याचा सल्ला दिला. सिद्धार्थ हा विजय व नागरिकांना शिवीगाळ करीत होता. त्यामुळे नागरिकही संतापले होते. विजय यांनी नागरिकांना आवरले नसते तर सिद्धार्थचा मुडदा पडला असता, अशीही चर्चा परिसरात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट