'भाजप-शिवसेना महायुतीतील अन्य मित्रपक्षांची गरज वाटत नसली तरी, निवडणुकीपूर्वी चौघांनाही दिलेले 'लव्ह लेटर' आणि आश्वासन पूर्ण करा, आम्ही भीक मागणार नाही', असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांनी बुधवारी येथे दिला.
इस्राइलच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर पत्रपरिषदेत बोलताना महादेव जानकर यांनी विधान परिषदेची निवडणूक आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सरकारविरुद्ध सावध पवित्रा घेत नाराजी व्यक्त केली. आमचे धोरण एकला चलो रे व पक्षाचे बळ वाढण्याचे आहे. आमची शक्ती वाढल्यावर सरकार झुकेल. प्रत्येकवेळी अधिवेशनापूर्वी विस्ताराची हुल देण्यात येते. कोणत्या अधिवेशनाचा मुहूर्त हवा, अधिक अंत न बघता सरकारने दिलेला शब्द पूर्ण करावा, असेही ते म्हणाले.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी युती असली, तरी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत कुणाशीही युती करणार नाही. जागा वाटपाच्यावेळी आमचे किती नगरसेवक आहेत, याआधारे उमेदवार निश्चित होतील. तेव्हा आम्हाला वाटाघाटीसाठी संधी मिळणार नाही. त्यामुळे आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. मुंबई महापालिकेच्या सर्व २२७ जागा स्वबळावर लढणार आहोत. राज्यातील अन्य महापालिका व जिल्हा परिषदांमध्ये आम्ही स्वबळावर लढू, असा निर्धारही जानकर यांनी व्यक्त केला.
धनगर आरक्षणाकडे लक्ष वेधले असता, मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर आरक्षण कोर्टात अडू नये, म्हणून आम्ही टाटा संस्थेच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहोत. अहवाल आल्यानंतर पुढच्या वर्षी सरकारने सवलती न दिल्यास या सरकारचेही पानिपत होण्यास वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून लोकसभेत एन्ट्री घेऊ, असा दावाही त्यांनी केला.
इस्त्राइलच्या दौऱ्यात सिंचनाचा अभ्यास करण्यात आला. सरकारने विविध प्रकल्पातून पाइप किंवा ड्रिपद्वारे सिंचन उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. यासंदर्भात अहवाल तयार करण्यात येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांना ७ जूनला सादर करण्यात येईल, अशी माहितीही जानकर यांनी यावेळी दिली. अहल्याबाई होळकर जन्मोत्सवाचा कार्यक्रम यंदा ३१ मे रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते यावेत, यादिशेने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट