गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे दोघेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'कमजोरी' आहेत. आनंदीबेन यांची जोवर इच्छा आहे, तोवर त्यांना पदावरून कोणीच हटवू शकत नाही, असा थेट हल्ला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सत्यसिंह गोहिल यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत चढवला.
लोकसभा निवडणूक काळात व केंद्रात सत्तेत आल्यावर भाजप नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची जंत्री गोहिल यांनी एका सादरीकरणाद्वारे पत्रकारांसमोर मांडली आणि त्यापैकी काहीच झाले नसल्याची वस्तुस्थिती असल्याचा दावा केला. गुजरातच्या मुख्यमंत्री बदलणार असल्याकडे लक्ष वेधले असता, 'कोण मुख्यमंत्री राहावा, हा भाजपचा अंतर्गत मुद्दा आहे. संघाचे प्रचारक असताना नरेंद्र मोदी हे शिक्षिका असलेल्या आनंदीबेन यांच्या निवासस्थानी मुक्काम करायचे. अमित शहा यांच्या माध्यमातून अनेक घाणेरडे कृत्य आणि बनावट एन्काउंटर घडवून आणले', असा आरोपही करून गोहिल म्हणाले, 'आनंदीबेन स्वतः पदत्याग करीत नाहीत किंवा सन्मानाने त्यांना पायउतार केले जाणार नाही तोपर्यंत त्याच मुख्यमंत्री राहतील.'
मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दोन वर्षांत दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्ती केली नाही, उलट जनतेची फसवणूक केली. केंद्राकडून शेतकरीविरोधी धोरण राबवण्यात येत आहे. शून्य ते चार टक्केपर्यंतच शेतमालाच्या हमी भावात वाढ केली. दुष्काळाबाबत सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर उपाययोजना केल्या. याउलट एक लाख १४ हजार कोटी रुपयांचे कॉर्पोरेट कर्ज माफ केले. मनरेगात दीडशे दिवस काम देणे तर दूर, यूपीएच्या काळातील रोजगारापेक्षा २० लाख कमी लोकांना रोजगार दिल्याची माहिती सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालात दिली आहे. जीडीपीबाबत पहिल्यांदाच प्रश्नचिन्ह उभारण्यात आले.'
दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. प्रत्यक्षात आतापर्यंत एक लाख ३४ हजार रोजगार उपलब्ध करून दिल्याची माहिती केंद्राच्या लेबर ब्युरोने उघड केली. गेल्यावर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या काळात आठ प्रमुख क्षेत्रातील २० हजार रोजगार कमी झाल्याकडे गोहिल यांनी लक्ष वेधले. यावेळी प्राचार्य बबनराव तायवाडे, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, सुरेश भोयर, अतुल कोटेचा, संदेश सिंगलकर उपस्थित होते.
हे कसले चौकीदार?
कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या. २६ मे २०१४ रोजी प्रती बॅरल १०८.०५ डॉलर भाव होता. यंदा २० मे रोजी ४८.४१ डॉलर भाव होता. निम्म्याहून कमी ५५.२० टक्के भाव झाले. सरकारने ग्राहकांना पेट्रोलमध्ये ११.७२ टक्के आणि डिझेलमध्ये ८.९ टक्के सवलत दिली. कच्च्या तेलाच्या भावानुसार डिझेल २५ रुपये ४० पैसे आणि पेट्रोल ३१ रुपये ९९ पैसे भावाने उपलब्ध होऊ शकते. 'मेक इन इंडिया'च्या घोषणेनंतर निर्यातीत ३४ टक्के घट आली. १४ हजार २१२ कोटी रुपये देशातून विदेशात गुंतवणूक गेली. काळा पैसा आणला नाही. मोदी स्वतःला देशाचे चौकीदार म्हणवून घेतात. मग ललित मोदी आणि विजय माल्ल्या पैसे कमावून कसे पळून गेले, असा सवालही गोहिल यांनी केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट