शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ड्रीम प्रोजेक्ट असलेले बहुप्रतीक्षित ट्रॉमा केअर सेंटर सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज आहे. उद्घाटनापूर्वी गेल्या आठ दिवसांपासून ट्रॉमात प्रायोगिक तत्त्वावरचा प्रयत्नदेखील यशस्वी झाला आहे. या ट्रॉमाच्या बाबतीत संकटांचा पाढा मात्र प्रशासनाची पाठ सोडायला तयार नसल्याचे वारंवार समोर येत असताना त्यात आणखी एका अंकाची भर पडली. एकीकडे उद्घाटनावरून तब्बल सहा महिने ड्रामा रंगल्यानंतर आता प्रशासनाने ट्रामासाठी पाच वर्षांपासून मनपाची परवानगीच घेतलेली नसल्याची बाब गुरुवारी समोर आली.
यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयातून धडकलेल्या एका पत्रामुळे सारेच गौडबंगाल समोर आल्याने प्रशासनाने गुरुवारी तडकाफडकी मनपा आणि नझूल कार्यालयात ठाण मांडून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. शहराच्या हद्दीत कोणत्याही स्वरुपाचे बांधकाम करायचे असेल तर त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणे गरजेचे असते. सरकारची मालकी असलेल्या सार्वजनिक वापराच्या इमारतीदेखील त्याला अपवाद नसतात. मनपाच्या परवानगीशिवाय बांधकामाचा कोणताही नकाशा मंजूर केला जात नाही. असे असतानाही मेडिकल प्रशासनाने तब्बल पाच वर्षांपासून ट्रॉमाच्या इमारतीसाठी मनपा, अग्निशमन विभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याची बाब समोर आली.
मेडिकलचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्या कार्यकाळात ट्रामाच्या इमारतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, बांधकाम विभागाने त्यासाठी मनपाची कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याची बाब समोर आली. मंत्रालयातून यासंदर्भात ट्रॉमामध्ये अग्निशमक यंत्रणा कार्यान्वित आहे का, अशी विचारणा केल्यानंतर ही निदर्शनास आली. त्यामुळे गुरुवारी तडकाफडकी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. या घडामोडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शनिवारी २८ मे रोजी ट्रॉमाच्या इमारतीचे लोकार्पण होणार असल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनानेही तातडीने हालचाल करीत ट्रॉमाला विशेष बाब म्हणून परवानी देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट