पाण्याअभावी राज्यातील काही प्रकल्पांतून वीजनिर्मिती ठप्प झाल्याने काही भागांमध्ये लोडशेडिंग सुरू झाले आहे. यातच आता राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांनीही संपाचे हत्यार उपसले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या तीन कंपन्यांमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता ७ जून रोजी लाक्षणिक संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाअंतर्गत राज्यात महानिर्मिती, महापारेषण व महावितरण, अशा तीन कंपन्या आहेत. या तिन्ही कंपन्यांतील कामगार, कर्मचारी अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन नाही. त्यामुळे वीज कंपन्यांनाही पेन्शन लागू करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनने लावून धरली आहे. मात्र, राज्य सरकारने यावर अजूनही काहीच निर्णय घेतलेला नाही. त्याचबरोबर कंत्राटी कामगारांना कायम करण्याची मागणी लावून धरली होती. मात्र, अजूनही तिन्ही वीज कंपन्यांमध्ये हजारो कामगार कंत्राटीपद्धतीने काम करीत आहेत. त्याचबरोबरच इतरही मागण्यांच्या पूर्ततेकरिता वीज कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एकीकडे आधीच लोडशेडिंग सुरू झाले आहे. अदानी प्रकल्पातून वीजनिर्मिती जवळपास ठप्प झाली आहे. त्यातच पाण्याअभावी इतर प्रकल्पांतील वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. त्यातच आता वीज कर्मचारी संपावर जाणार असल्याने या समस्येत भर पडण्याची शक्यता आहे.
वीज कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापन आणि ऊर्जामंत्री यांच्यासोबत अनेकवेळा चर्चा झाली. विशेष म्हणजे अनेकदा यावर फक्त आश्वासन देण्याखेरीज काहीही झाले नाही. त्यामुळे नाईलाजाने कामगार संघटना संयुक्त कृती समितीने ७ जूनला २४ तासांच्या लाक्षणिक संपावर जाण्याची नोटीस तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाला दिली आहे.
दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर कृती समितीतर्फे गुरुवारी महावितरणच्या काटोल रोड येथील मुख्य अभियंता कार्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली. यात व्यवस्थापनाच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी फेडरेशनचे संयुक्त सचिव सी. एम. मौर्य, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे रवी वैद्य, सबऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनचे दिलीप भालेराव, कामगार महासंघाचे शंकर पहाडे उपस्थित होते. सभेला सुमारे तीनशेपेक्षा अधिक कर्मचारी, अभियंते उपस्थित होते. कृती समितीत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन (आयटक), सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य तांत्रिक कामगार युनियन, इंटक फेडरेशन या सहा संघटनांचा समावेश आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट