नाग नदीच्या पात्रातील स्वच्छतेसाठी तांत्रिक यंत्रणा अद्यापही अपुरी पडत आहे. नदीच्या पात्रात कर्मचाऱ्यांचीच कामाची मालकी असून, तेच पात्राची स्वच्छता करीत आहेत. अंबाझरी ते आता सध्या सुरू असलेल्या सेंट्रल मॉलपुढील नाग नदीचे पात्र कर्मचाऱ्यांच्या बळावरच बरेचसे स्वच्छ झाले आहे.
पोकलॅण्डअभावी पात्रातील गाळ काढणे अवघड असल्याने कर्मचाऱ्यांकडून कचरा स्वच्छतेचे काम करण्यात येत आहे. पिवळी व पोहरा नदीच्या स्वच्छतेसाठीची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. गेल्या १९ दिवसांपासून सुरू असलेल्या या अभियानात नाग नदीच्या सहा, पिवळी नदीच्या चार आणि पोहरा नदीच्या तीन टप्प्यांतील पात्र बऱ्यापैकी स्वच्छ होत आहे. आधी जाहीर केल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात नदी स्वच्छतेसाठी मशिनरी यंत्रणा मनपाला मिळणार होती. मात्र, ती उपलब्ध न झाल्यामुळे मनपाला मनुष्यबळावरच बरेचसे अवलंबून राहावे लागत आहे. अभियानाच्या प्रारंभीही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेली शंका खरी ठरली. त्यामुळे आधीपासूनच सज्ज असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या परिश्रमात दुपटीने वाढ करीत जोमाने कामास सुरुवात केली. त्यामुळेच पात्र अधिक खुलत आहे. पाण्याचा प्रवाहही वाढत आहे.
शुक्रवारी नाग नदीच्या अंबाझरी टप्प्यात सेंट्रल मॉल ते सराफ चौकापर्यंतच्या पात्रात कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करण्यात आली. तर, गाडगा येथील नाल्यातील गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. 'मटा'च्या पुढाकारानंतर नाग नदी स्वच्छता अभियानाची मोहीम गतिमान झाली आहे. त्याला आता अधिक वेग आला आहे. ही आता एक लोकचळवळ बनावी, अशी अपेक्षा आहे. सध्या केवळ ग्रीन व्हिजिल फाउंडेशनने नाग नदीसासाठी पथनाट्य सादर करून लोकांना साद घालण्याचा प्रयत्न केला. आणखी एक-दोन संघटना, संस्था या अभियानात सहकार्य करीत आहेत.
इतर संस्थांनीही पुढे येण्याची गरज आहे. आतापर्यंतच्या स्वच्छतेनुसार अंबाझरी ओव्हरफ्लो ते शंकरनगर चौकापर्यंतचे नाग नदीचे पात्र अधिक रुंद झाल्याचे दिसत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट