नागपूर : कामचुकार कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी बायोमेट्रिकचा अवलंब करण्यात येतो. मात्र, यातून संधी हेरून काही कर्मचारी कार्यालयाला दांडी मारतात. यावर उपाय म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्यावर वचक ठेवण्यासाठी नागपूर जिल्हा परिषद 'व्हॉटस्अॅप ग्रुप' तयार करीत आहे.
याबाबतच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत. सामान्य प्रशासन विभाग, विभागप्रमुख आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे व्हॉट्सअॅपवर कर्मचाऱ्यांची माहिती देण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. विभागप्रमुख आणि संबंधित अधिकारी व्हॉटस्अॅप ग्रुपवर नेमका कोणता कर्मचारी गैरहजर आहे, याची माहिती दररोज सीईओंना देतील. तर, कोणतीही पूर्वसूचना न देता दांडी मारण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विशेष लक्ष असेल. याची संपूर्ण माहिती डॉ. बलकवडे यांनी विभागप्रमुखांना दिली आहे. साधारणतः आठवडाभरात ही प्रक्रिया सुरू होईल. सध्या जिल्हा परिषदेत ८५०० कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी शिक्षकांची संख्या सर्वाधिक म्हणजे पाच हजारांच्या घरात आहे. नागपुरातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात कामचुकार कर्मचाऱ्यांची संख्या तशी नाही. मात्र, ग्रामपंचायत, पंचायत समितीवर देखरेख ठेवताना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची दमछाक होते. तेथे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांचे नियंत्रण असले तरीही काही कर्मचारी पूर्वसूचना न देता कार्यालयाला दांडी मारतात, हे प्रकार येथे घडत आहेत. ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना दौऱ्यातून दिसून आली. तत्पूर्वी, कामचुकार कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करण्यात आला. मात्र, कधी-कधी बायोमेट्रिकमध्ये बिघाड आल्याचे सांगून वरिष्ठांची दिशाभूल केली जात होती. ही बाब नव्याने रुजू झालेल्या सीईओ डॉ. बलकवडे यांच्या लक्षात आली. त्यामुळे डॉ. बलकवडे यांनी सर्व विभागप्रमुखांना व्हॉटस्अॅप ग्रुप तयार करण्याची सूचना केली आहे.
कामात येणार गती
राज्यात ३४ जिल्हा परिषदा आहेत. तेथील कामचुकार कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी बायोमेट्रिक मशिनी लावण्यात आल्या आहेत. पण, अनेक बायोमेट्रिक मशिनी बंद असतात. याचा गैरफायदा काही कर्मचारी घेतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम होत आहे. ही बाब प्रकर्षाने नागपूर जिल्हा परिषदेत जाणवत आहे. प्रत्येक विभागात पाच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. यावर व्हॉट्सअॅप ग्रुपची किमया कामचुकार कर्मचाऱ्यांवर लय भारी ठरणार आहे. तसेच याद्वारे कामाची गती वाढेल, असे बोलले जाते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट