जी.टी. एक्स्प्रेसमधून शुक्रवारी दुपारी ३३ हजार ९२५ रुपयाची अवैध दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्तांनी स्वतः केली.
१२६१६ नवी दिल्ली- चेन्नई जीटी एक्स्प्रेसमधून दारूची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती सकाळी ११.२० च्या सुमारास मध्य रेलवेचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांना मिळाली होती. दुपारी १२.२० वाजता ही गाडी नागपूर स्थानकावर येणार होती. त्यामुळे त्या वेळी स्वतः सतिजा आरपीएफ अधिकारी- कर्मचाऱ्यांसह गाडी येणार असलेल्या प्लॅटफॉर्म क्र. २ वर गेले. या गाडीच्या एस- ३ बोगीत ही अवैध दारू असल्याची सूचना होती. गाडी येताच आरपीएफने एस-३ बोगीत तपासणी सुरू केली. त्यावेळी या बोगीत चार बेवारस बॅग आढळल्या. बोगीतील प्रवाशांवना या बॅगविषयी विचारले मात्र कोणीही या बॅग आपल्या असल्याचे सांगितले नाही. त्यामुळे या बॅग उतरवून तपासणी करण्यात आली त्यावेळी त्यात बॉम्बे स्पेशल व्हिस्की ७५० मिलिच्या ३५ बाटल्या तसेच ऑफिसर चॉइस व्हिस्की ९० मिलीच्या ३७० बाटल्या आढळून आल्या. या दारूची किंमत ३३,९२५ रु. आहे. आरपीएफ उपनिरीक्षक राय यांनी पंचनामा करून ही अवैध दारू जप्त केली. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी जप्त करण्यात आलेली दारू उत्पादन शुल्क विभागाकडे सोपविण्यात आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट