ऐन जून महिन्यात तापलेला पारा, त्यात आकाशात फक्त ढग, त्यामुळे वाढलेला उकाडा, अशा स्थितीत शुक्रवारी पाऊस अखेर बरसल्याने साऱ्यांनाच दिलासा मिळाला. वळव्याच्या या दमदार एण्ट्रीनंतर आता मान्सून उंबरठ्यावर आला आहे. त्याचा जोर दोन दिवसांत वाढणार आहे.
नागपूरसह विदर्भात मान्सूनची तारीख १२ ते १४ जून आहे. मागील १२ वर्षांत या मान्सूनने सात वेळा २० तारखेच्या आसपासच धडक दिली आहे. पण, यंदा मात्र पावसाने अधिकच ओढ दिली. आधी केरळात तो विलंबाने आला. त्यानंतर केरळ ते कोकणादरम्यान खोळंबून बसला. यामुळे विदर्भातही ऐन जून महिन्यात पारा ४३-४४ अंशांपर्यंत पोहोचला. प्रत्येकाला पावसाची प्रतीक्षा असताना रोज वातावरणनिर्मिती होत होती. पाऊस मात्र पडत नव्हता. शुक्रवारी मात्र ही प्रतीक्षा बहुतांश प्रमाणात पूर्ण झाली. नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. प्रामुख्याने पूर्व विदर्भातच पाऊस होता. उर्वरित ठिकाणी वातावरण पूर्ण ढगाळ राहिल्याने पाऱ्यात मोठी घसरण झाली. अमरावतीमध्ये कमाल पारा ३० अंशांपर्यंत घसरला. पावसाळी वातावरणामुळे सर्वच ठिकाणी उष्णतेची लाट पूर्णपणे ओसरून पारा ३५ ते ४० अंशांदरम्यान राहिला. यामध्येही नागपूरचेच तापमान ४०.४ अंशांसह राज्यात सर्वाधिक राहिले.
नागपूर शहरात सकाळपासूनच आकाश पूर्ण ढगाळ होते. काही भागात पावसाची रिपरीप झाली. पण त्यानंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास सूर्याने डोके बाहेर काढले. यामुळे ऊन पुन्हा तापले. आता पाऊस काही येत नाही, अशी चिन्हे असतानाच दुपारी दोननंतर ढग पुन्हा दाटून आले. वादळी वाऱ्यासोबत दमदार पाऊस सुरू झाला. पावसाचा जोर आधी केवळ उत्तर आणि पूर्व नागपुरात होता. त्यानंतर हळूहळू पश्चिम आणि दक्षिण भागातही पाऊस पडला. जवळपास एक तास कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र वादळी वाऱ्यांसह पाऊस पडला. त्यानंतर सायंकाळपर्यंत पावसाची हलकी रिपरीप सुरूच होती.
दरम्यान, विदर्भाच्या काही भागात शुक्रवारी पडलेला पाऊस वळव्याचा ठरला. मान्सूनच्या आधी पडलेला हा पूर्वमोसमी पाऊस होता. यानंतर आता मान्सून विदर्भाच्या जवळच आला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत तो विदर्भात येऊन धडकेल. प्रामुख्याने बंगालच्या उपसागरात मान्सूनमुळे तयार झालेल्या वादळी वातावरणाचा परिणाम आहे. या वातावरणामुळे तयार झालेली द्रोणिका छत्तीसगडपर्यंत आहे. त्याचा प्रभाव विदर्भावर होत आहे. यातूनच पुढील दोन दिवसांत विदर्भाच्या १०० टक्के भागात 'वाईड स्प्रेड' स्वरुपाचा पाऊस पडेल, तर रविवारी पावसाचा जोर अधिक असेल. तोच मान्सून ठरू शकतो, असे येथील प्रादेशिक हवामान केंद्राचे म्हणणे आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट