धावत्या गाडीतून पडून पती, पत्नी गंभीर जखमी होण्याची घटना सोमवारी दुपारी १२.३०च्या सुमारास अजनी- खापरीदरम्यान शालिमार एक्स्प्रेसमध्ये घडली. अलमगिरी खान (३२) व हनुफा बेगम (२८) अशी या दाम्पत्याची नावे असून त्यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या दाम्पत्यासह असलेली त्यांची सहा वर्षांची मुलगी हा प्रकार पाहून प्रचंड पाहून घाबरून गेली आहे.
यातील पती बेशुद्धावस्थेत आहे, तर पत्नी गंभीर असली तरी बोलत आहे. मात्र, तिला फक्त बंगाली भाषा येत असल्याने बंगाली दुभाषी वापरून पोलिस माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. महिलेने दिलेल्या बयानानुसार, हे दाम्पत्य हावडा येथील असून ते मजुरी करतात. महिनाभरापूर्वी ते अशाच कामासाठी सुरतला गेले होते. तेथून ते मुंबईला गेले. मुंबईत असताना ते ज्या पसिरात राहात होते तेथे त्यांच्यावर ३० हजार रुपये चोरल्याचा आळ आला. त्यामुळे दोघांनीही मुलीसह आपल्या गावाला, हावड्याला परत जाण्याचा निर्णय घेतला. १८०२९ मुंबई- हावडा शालिमार एक्स्प्रेसने ते प्रवासाला निघाले. मात्र, प्रवासात ते तणावातच होते. ही घटना घडली त्यावेळी दोघेही जनरल बोगीच्या दारात बसले होते. मुलगी आत बसली होती. अचानक तोल जाऊन दोघेही पडल्याचे महिलेचे म्हणणे आहे. सहप्रवाशांना हे दोघे खाली पडल्याचे लक्षात येताच त्यांनी साखळी ओढून गाडी थांबवली. त्यानंतर गार्डच्या डब्यातून त्यांना जखमी अवस्थेत नागपूर स्थानकावर आणण्यात आले.
दरम्यान, गार्डने रेल्वे कंट्रोलला या घटनेची माहिती दिली होती. त्यामुळे आरपीएफचे उपनिरीक्षक एच.एल. मीना, आर.पी. सिंग, विक्रम यादव यांनी गाडी येताच प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर धाव घेतली. याचवेळी स्थानकावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. मेधा तसेच या कॉलेजची रुग्णवाहिका उपलब्ध होती. डॉ. मेधा यांनी तेथेच जखमींची तपासणी केली. दोघांच्याही डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे त्यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रेल्वे स्थानकावरील सिराज, वसीम शेख, रफिक भाई, सोनू शेख या ऑटो चालकांनीही या कामात मदत केली. लोहमार्गचे मरापे यांनी या महिलेचे मेयो हॉस्पिटलमध्ये जाऊन बयान नोंदवून घेतले. पुढील तपास लोहमार्ग पोलिस करीत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट